- महेश कोले/मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदा राजकीय पक्षांनी विशेषत: भाजप आणि शिंदेसेनेने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शेकडो बसगाड्यांचे बुकिंग केले आहे. यात एसटी महामंडळाच्या ८४३ आणि इतर खासगी अशा हजारावर बसेस आहेत.
भाविकांना कोकणात सोडण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेमध्ये जणू रस्सीखेच सुरू आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत शिंदेसेनेच्या सर्व ३६४ बसेस कोकणाकडे रवाना झाल्या, तर दोन दिवसांत भाजपकडून ४६२ बसेस सोडण्यात आल्या. सोमवारी १७ बसेस सोडण्यात येतील. पश्चिम उपनगरांतील वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, दिंडोशी, मागाठाणे, बोरिवली, प्रभादेवी आदी भागांतून ४४४ बसमूधन २० हजार भाविक रवाना झाले. गणेशभक्तांना पूजेचे साहित्य, पाण्याची बाटली, नाष्टा देण्यात येत होता.
कोणाच्या किती बसेस?आ. प्रकाश सुर्वे (१००), दिंडोशी विभागप्रमुख वैभव भरडकर (८९), कुणाल सरमळकर (५२, सर्व शिंदेसेना), भाजप आ. संजय उपाध्याय (८०), उद्धवसेनेचे आ. सुनील प्रभू (१०), बाळा नांदगावकर (४८), अंधेरी विभाग अध्यक्ष रोहन सावंत (५, दोघेही मनसे).
एसटी महामंडळाच्या गाड्यांसोबतच राजकीय पक्षांकडून शनिवारी आणि रविवारी कोकणात बसेस सोडण्यात आल्या. सीटनुसारच त्यांचे भाडे आकारले जाते. राज्यातील विविध भागांतून या बस आणण्यात आल्या.- अभिजित पाटील, मुंबई विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ