फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ९० लाखांची फसवणूक; डेव्हलपर्ससह दाेघांवर गुन्हा; पोलिस तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:26 IST2026-01-20T14:25:17+5:302026-01-20T14:26:04+5:30
आग्रीपाडा येथील व्यावसायिक बंधूंची फसवणूक

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ९० लाखांची फसवणूक; डेव्हलपर्ससह दाेघांवर गुन्हा; पोलिस तपास सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने दाेन भावांची ९० लाख १४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी स्काय हाय रिलेटर्स अँड डेव्हलपर्सचे मालक जाफर मजीद सिद्धीकी व अब्दुल करीम मजीद खान याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
तक्रारीनुसार, आग्रीपाडा येथील इम्पोर्ट-एक्स्पोर्ट व्यावसायिक सिराज सोपारीवाला (६५) व त्यांचा भाऊ सोहिल (५१) यांनी २०११ साली मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. टू बीएचकेचे दोन फ्लॅट खरेदी करण्यासाठी सोपारीवाला बंधूंनी जाफर सिद्धीकी व अब्दुल खान याच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी अल क्युबा पॅलेस या प्रस्तावित इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २२०१, २२०२ बाबत त्यांना माहिती देण्यात आली. फ्लॅट विकत घेण्यास इच्छुक असल्याने १८ फेब्रुवारी २०११ रोजी सिराज यांनी १९ लाख, तर सोहिल यांनी १२ लाख रुपयांचे धनादेश आगाऊ रक्कम म्हणून त्यांना दिले, तसेच उर्वरित रक्कम रोख स्वरूपात दिली.
आश्वासन फोल, प्रकल्प अपूर्ण
१५ जून २०११ रोजी अलॉटमेंट लेटर देत २०१४ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले; पण अनेक वर्षे उलटूनही प्रकल्प पूर्ण झाला नाही.
गुन्हेगारी संबंधांआड भावांना धमकावले
फ्लॅटसाठी सोपारीवाला बंधूंनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रत्येक वेळी डेव्हलपर्सने परवानग्यांचे कारण देत त्यांना टाळले. पैसे परत मागितले असता डेव्हलपर्सने गुन्हेगारी संबंधांचा उल्लेख करत त्यांना धमकावले. अखेर दोन्ही भावांनी पोलिस ठाणे गाठले व घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.