वृद्धेला ४० लाखांचा गंडा; गुन्हा दाखल, ईडी, अन्य यंत्रणांची दाखवली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:27 IST2024-05-20T15:26:17+5:302024-05-20T15:27:34+5:30
लता सावंत (वय ७०) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी रात्री त्यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला.

वृद्धेला ४० लाखांचा गंडा; गुन्हा दाखल, ईडी, अन्य यंत्रणांची दाखवली भीती
अलिबाग : पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगत ईडी व इतर यंत्रणांची भीती दाखवत येथील एका वृद्धेचे बँक खाते साफ केल्याची घटना घडली आहे. तिच्या बँक खात्यातून ऑनलाइन ४० लाख ७३ हजार ७१९ रुपये काढून घेतले आहेत.
लता सावंत (वय ७०) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी रात्री त्यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथोरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगत तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असून, मोबाइल फोन बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एक कॉल आला.
- त्यात पोलिस अधिकारी दीक्षित मॅडम आणि विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगत, तुमच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती दाखवली.
- ईडी व इतर यंत्रणेचीही भीती दाखविण्यात आली. समोरून विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगितल्याने लता सावंत यांचा विश्वास बसला व भीतीपोटी त्यांनी आपल्या बँक खात्यातील सर्व माहिती त्यांना सांगितली. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाइन ४० लाख ७३ हजार ७१९ रुपये काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अलिबाग पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.