Join us

Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 05:31 IST

Mumbai Govandi Accident: गोवंडीतील शिवाजीनगर लोटस जंक्शनजवळ शनिवारी दुपारी एका भरधाव डम्परने दुचाकीवरील चौघांना चिरडले.

मुंबई : गोवंडीतील शिवाजीनगर लोटस जंक्शनजवळ शनिवारी दुपारी एका भरधाव डम्परने दुचाकीवरील चौघांना चिरडले. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुले आहेत. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. जमावाने पोलिसांनाही गराडा घातला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

साकीनाका येथून एका दुचाकीवरून चार जण देवनारकडे येत होते. घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर शिवाजीनगर येथील लोटस जंक्शनजवळ त्यांच्या दुचाकीला डम्परने धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने डम्परच्या काचा फोडल्या आणि तोडफोड केली. देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डम्परचालकाला अटक केली. 

गोवंडी येथील शिवाजीनगर सिग्नलवर शनिवारी उभ्या असलेल्या एका दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात दुचाकीवरील चौघांचाही मृत्यू झाला. चौघांपैकी तिघे हे चौदा वर्षांखालील होते. तर दुचाकीचालक डिलिव्हरी बॉय होता. साकीनाका येथे राहणारा हा चालक गोवंडीमध्ये काही कामानिमित्त आला होता. दरम्यान, जखमींना तातडीने घाटकोपरमधील राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे गोवंडीतील रहिवाशांनी वाहतूक पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला असून, येथील त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले आहे.

मोठ्या संख्येने जमाव जमल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी आली. पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने आक्रमक होत वाहतूक रोखली. परिणामी दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीमारही केला.   

मुंबई महापालिकेने ६०० कोटी रुपये खर्चून बांधलेला घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड पूल २०२१ मध्ये वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, या पुलावरून अवजड वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे ही वाहने डम्पिंग, बैंगनवाडी आणि शिवाजीनगर सिग्नलवरून भरधाव जातात. येथे स्पीड ब्रेकरही नाही. हा परिसर सतत वर्दळीचा असल्याने येथे अपघात वाढत आहेत, अशी भीती रहिवाशांनी शनिवारच्या अपघातानंतर व्यक्त केली.

टॅग्स :अपघातमुंबईमहाराष्ट्र