ज्येष्ठ नागरिकावर उपचार करण्यास चार हॉस्पिटलचा नकार; वर्सोव्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:40 IST2020-05-08T02:40:24+5:302020-05-08T02:40:39+5:30

मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्यासही विलंब

Four hospitals refuse to treat senior citizens; The events in Versova | ज्येष्ठ नागरिकावर उपचार करण्यास चार हॉस्पिटलचा नकार; वर्सोव्यातील घटना

ज्येष्ठ नागरिकावर उपचार करण्यास चार हॉस्पिटलचा नकार; वर्सोव्यातील घटना

मनोहर कुंभेजकर
 

मुंबई : कोविड-१९च्या काळात कोणालाही मरण येऊ नये अशी हृदयद्रावक घटना वर्सोवा, अंधेरी पश्चिम आरटीओ परिसरात घडली. वर्सोव्यात ७४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा येथील चार रुग्णालयांनी नकार दिल्याने त्यांचा उपचारांविना मृत्यू झाला. तर मृत्यूनंतरही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व के पश्चिम वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त विकास मोटे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनार खान यांनी विनंती करूनही या ज्येष्ठ नागरिकाचा १९८०पासून असलेल्या त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार दिला. शिवसेनेने प्रयत्न करून अखेर या ज्येष्ठ नागरिकाचे मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवले. अखेर मध्यरात्री ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. शिवसेनेचे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

येथील सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक मागील ६ महिन्यांपासून पार्किन्सन व श्वासोच्छवासाच्या विकाराने आजारी होते. बुधवारी सकाळी ११च्या सुमारास ते अत्यवस्थ झाले. त्यानंतर त्याच सोसायटीचे रहिवासी व शिवसेना गटप्रमुख नीलेश देवकर व अन्य लोकांनी त्यांना मनीषनगर तसेच आरोग्य निधी, कूपर हॉस्पिटल येथे नेले असता तेथेही या अवस्थेतील रुग्णाला प्रवेश नाकारण्यात आला. तेथून पुढे कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता त्यांनीही प्रवेश नाकारला व घरी नेऊन १९१६ या फोनवरून संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

यात सायंकाळचे ४ वाजले. या रुग्णाला घरी नेल्यानंतर सायं. ५.१५च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या भीतीने कोणीही डॉक्टर (१९८० सालापासून तपासणी करणारे डॉ. नितीन सावे हेसुद्धा) मृत्यूचे प्रमाणपत्र देईना. हे सर्व पाहून गटप्रमुख नीलेश देवकर यांनी विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी सिद्धेश चाचे, राजेश शेट्ये व नगरसेविका प्रतिमा खोपडे यांना संपर्कात ठेवून पुढील कारवाई करण्याकरिता सुरुवात केली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी के पश्चिम प्रभागाचे सहायक पालिका आयुक्त विकास मोटे व येथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनार खान यांच्याशी संपर्क करायला सुरुवात केली. त्यांनी डॉ. सावे यांना सांगूनही ते प्रमाणपत्र देईनात. शेवटी उपविभाग प्रमुख राजेश शेट्ये यांनी रात्री ११.३० वा. ही माहिती शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजूलताई पटेल यांच्या कानावर घातली. पण त्यांचेही काही चालेना.

सरतेशेवटी मध्यरात्री त्यांच्या सोसायटीमधील सभासदांमार्फत प्रमाणपत्र मिळवून पहाटे ३.३० वाजता कसाबसा विधी आटोपला. गटप्रमुख नीलेश देवकर यांनी मग सकाळी ही सगळी कहाणी राजेश शेट्ये यांना कथन करून नाराजी व्यक्त केली.

Web Title: Four hospitals refuse to treat senior citizens; The events in Versova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.