Four arrested by police for rape in Mumbai, gang rape | सामूहिक बलात्काराने मुंबईत खळबळ, पोलिसांकडून तातडीने चौघांना अटक

सामूहिक बलात्काराने मुंबईत खळबळ, पोलिसांकडून तातडीने चौघांना अटक

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकाकडे पायी जात असताना वाटेतील झुडपात लघुशंकेसाठी गेलेल्या ३१ वर्षीय विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री घडली. नेहरूनगर पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली आहे.

तक्रारदार महिला मूळची मध्य प्रदेश येथील रहिवासी असून, वरळीत कुटुंबासोबत राहते. गावी नातेवाईक आजारी असल्याने त्या एकट्याच त्यांना भेटण्यासाठी निघाल्या. रात्री ११ वाजता कुर्ला स्थानकात उतरून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रेल्वेने जायचे असल्याने त्या पायीच स्थानकाच्या दिशेने निघाल्या. साबळेनगर येथील झुडपामध्ये त्या लघुशंकेसाठी गेल्या. आरोपी सोनू तिवारी (२५) आणि नीलेश बारसकर (२५) हे झुडपाच्या पलीकडे उभे होते. त्यांनी महिलेला पकडून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

त्याचवेळी तेथून दुचाकीवरून जात असलेल्या सिद्धार्थ वाघ (२५), श्रीकांत भोगले (२९) यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यानंतर दोघांनी महिलेची सुटका करण्याऐवजी तिच्यावर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचार केला. तेथून निघताना महिलेकडील ३ हजार रुपयांसह तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चौघांनी पळ काढला. पीडित महिलेने रस्त्यावर येत मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर एका महिलेने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क करून माहिती दिली. त्यातील दोघे जण नागरिकांच्या हाती लागले. त्यांच्यापाठोपाठ अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनीअटक केली.

चौघेही कुर्ला येथील रहिवासी आहेत. सिद्धार्थ हा रिक्षाचालक, तर श्रीकांत हा डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करतो. नीलेश शीतपेय विक्रेता आहे. सोनू तिवारी बेरोजगार आहे. चौघेही मित्र आहेत. प्राथमिक माहितीत तरी त्यांच्याविरुद्ध अद्याप एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चौघांनाही अटक करून तपास सुरू असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली.

Web Title: Four arrested by police for rape in Mumbai, gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.