सुपारीचा कट उघड, चारकोप ते पुणे... आरोपींचा शेतातून जंगलापर्यंत थरारक पाठलाग, गोळीबार करणारे अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:47 IST2025-11-22T09:44:26+5:302025-11-22T09:47:19+5:30

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चारकोपमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

Four Arrested After Cross City Hunt Charkop Shooting Linked to Contract Killing Dramatic Chase in Pune | सुपारीचा कट उघड, चारकोप ते पुणे... आरोपींचा शेतातून जंगलापर्यंत थरारक पाठलाग, गोळीबार करणारे अखेर जेरबंद

सुपारीचा कट उघड, चारकोप ते पुणे... आरोपींचा शेतातून जंगलापर्यंत थरारक पाठलाग, गोळीबार करणारे अखेर जेरबंद

Mumbai Crime: मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात बुधवारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका बिल्डरचे साथीदार आणि इस्टेट एजंट असलेले फ्रेडी डिलिमा यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या डिलिमा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

दिवसाढवळ्या हल्ला

बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चारकोप येथील फादर सुसाई इंग्रजी शाळेजवळ डिलिमा एका मित्राच्या दुकानातून बाहेर पडत असतानाच, त्यांच्या मागावर असलेल्या तीन हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर देशी बनावटीच्या कट्ट्यातून गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेली एक गोळी डिलिमा यांच्या पोटात लागल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार करून तिन्ही हल्लेखोर हेल्मेट घातलेल्या अवस्थेत दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ डिलिमा यांना रुग्णालयात दाखल केले.

सीसीटीव्ही आणि पाठलाग

परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर चारकोप पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला. या फुटेजमध्ये हल्लेखोर दिसत होते. मुंबई गुन्हे शाखेने या तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपींचा माग पुणे शहरापर्यंत लागला. गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे धाव घेतली असता आरोपी एका शेतात लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न करताच, आरोपींनी जवळच्या जंगलाच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने काही किलोमीटरचा थरारक पाठलाग करून चारही आरोपींना पकडले.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे उघड झाली आहेत. यात राजेश रमेश चौहान (४२, कांदिवली, मुंबई), सुभाष भिकाजी मोहिते (४४, विरार, पालघर), मंगेश एकनाथ चौधरी (४०, भोर, पुणे) आणि कृष्णा उर्फ रोशन बसंत कुमार सिंग (२५, काशीगाव, ठाणे) यांचा समावेश आहे. या चौघांनाही पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मुंबईत आणले जात आहे आणि त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींचा डिलिमा यांच्याशी काय संबंध आहे, हे तपासण्यासाठी पोलीस त्यांची कोठडी मागणार आहेत. या घटनेमागील उद्देश आणि अन्य दुवे तपासानंतरच स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गोळीबारातील मुख्य आरोपी राजेश चौहान आणि फ्रेडी डिलिमा हे पूर्वी एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात पैशांचे व्यवहार आणि मालमत्तेवरून तीव्र वाद सुरू होता. या वादातूनच राजेश चौहान याने फ्रेडी यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. फ्रेडीला संपवण्यासाठी राजेश चौहानने शूटरला सुपारी दिली होती. हल्ल्यापूर्वी शूटरने फ्रेडी डिलिमाची रेकी केली. रेकीनंतर फ्रेडी ज्या वेळी नेहमी आपल्या मित्राच्या दुकानात येतात, नेमक्या त्याच वेळी, त्यांच्यावर गोळीबार करण्याचे ठरवले होते.
 

Web Title : सुपारी किलिंग का पर्दाफाश: उपनगर से जंगल तक पीछा, शूटर गिरफ्तार

Web Summary : मुंबई में बिल्डर के सहयोगी पर दिनदहाड़े गोलीबारी। पुलिस का पीछा पुणे तक, गिरफ्तारियां। पैसे और संपत्ति के विवाद के चलते सुपारी किलिंग हुई। चारों अपराधी हिरासत में।

Web Title : Supari Killing Exposed: Chase from Suburbs to Forest, Shooters Arrested

Web Summary : Mumbai builder's associate shot in broad daylight. Police chase leads to arrests in Pune. Dispute over money and property led to the contract killing. All four perpetrators are in custody.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.