AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 06:47 IST2025-07-30T06:47:28+5:302025-07-30T06:47:28+5:30
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे.

AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये तब्बल ३४ टक्के वाढ झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या जागा यंदा १२,६६०वरून १६,९९५ झाल्या आहेत. त्यातून इंजिनीअरिंग कॉलेजांचा कॉम्प्युटर आणि तत्सम अभ्यासक्रम सुरू करण्याकडे अधिकाधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १८,८७१ने वाढ होऊन यंदा प्रवेशासाठी एकूण १ लाख ७६ हजार ९५ जागा उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षी इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १,५७,२२४ जागा उपलब्ध होत्या. विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहून महाविद्यालयांनी यंदा सर्वाधिक जागा कॉम्प्युटर शाखेच्या संबंधित अभ्यासक्रमांच्या वाढविल्या आहेत. त्यामध्ये आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा एकूण ९१,५२५ जागा उपलब्ध असतील. गेल्या वर्षी याच अभ्यासक्रमांना ७७,६२६ जागा होत्या.
मागील काही वर्षांत तंत्रज्ञानात मोठे बदल झाले असून, आर्टिफिशियल इंटेलिजिन्स क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांचाही या शाखेकडे कल वाढला आहे. मात्र, असे असले तरी गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कल घटलेल्या मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग संबंधित जागांमध्येही यंदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातून इंजिनीअरिंगच्या प्रमुख शाखा असलेल्या या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थी प्रवेश घेतील, अशी संस्था चालकांना आशा आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा
यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीद्वारे प्रवेशासाठी तब्बल २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, प्रवेशासाठी जागांमध्ये वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी किती? यंदा किती?
शाखेचे नाव २०२४-२५ २०२५-२६
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड सायन्स ५१,९७५ ५९,४२७
आर्टिफिशियल इंटेलिजन्स १२,६६० १६,९९५
आयटी १२,९९१ १५,१०६
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग २३,४०६ २५,९५६
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग १२,०४१ १२,८९९
मेकॅनिकल इंजिनीअरिंग २०,९४२ २१,४४३
सिव्हिल इंजिनीअरिंग १४,९८० १५,५४१
ऑटोमेशन ॲण्ड रोबोटिक्स ९०० १,०८०
सायबर सिक्युरिटी १५० १५०
डेटा सायन्स ४५० ४५०