भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:11 IST2025-05-21T16:11:13+5:302025-05-21T16:11:41+5:30

एमएमआरसीकडून कफ परेड ते आरे या ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून त्यावर २७ स्थानके आहेत.

Four and a half lakh people travelled on the underground metro in ten days, passenger numbers started increasing after the second phase started | भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात

भुयारी मेट्रोवर दहा दिवसांत साडेचार लाख जणांचा प्रवास, दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात

मुंबई : कफ परेड ते आरे या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यावर या मेट्रो मार्गिकेवरील प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली आहे. पहिल्या दहा दिवसांत या मेट्रो मार्गिकेवरून तब्बल ४ लाख ७० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून दरदिवशी या मेट्रो मार्गिकेचा सरासरी ४७,०५३ प्रवाशांकडून वापर होत आहे. त्यामध्ये आणखी वाढीची अपेक्षा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून व्यक्त केली जात आहे.

एमएमआरसीकडून कफ परेड ते आरे या ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असून त्यावर २७ स्थानके आहेत. त्यासाठी ३७,२७६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचा १२.६९ किमी लांबीचा मार्ग ७ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत आला. मात्र सात महिने उलटल्यानंतरही या मेट्रो मार्गाला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नव्हता. त्यातून दरदिवशी सरासरी केवळ २० हजार प्रवाशांकडून या मार्गिकेचा वापर होत होता. तर एमएमआरसीकडून ४ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक स्थानक या दुसऱ्या टप्प्याचे ९ मे रोजी लोकार्पण झाले. तर १० मेपासून या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यातील ९.७७ किमी लांबीच्या मार्गावर ६ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू आहे. त्यातून आरे ते वरळी नाका असा थेट प्रवास शक्य झाला आहे. 

ऑगस्टपर्यंत संपूर्ण मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न
सध्या मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडी आठ डब्ब्यांची आहे. या गाडीतून एकाचवेळी २४०० प्रवाशांनी प्रवास करण्याची क्षमता आहे. 
सध्या या मार्गिकेचा आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा टप्पा सुरू झाला आहे. तर आरे ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर १३ लाख प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित आहे. ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण मार्ग सुरू करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. 

असा आहे प्रकल्प
३३.५ किमी एकूण लांबी : 
कफ परेड ते आरे.
२२.३५ किमी सध्या सुरू असलेला मार्ग :  आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी 
सरासरी प्रवासी संख्या ४७,०५३ 

७ ऑक्टोबर ते १८ मेपर्यंत प्रवासी ४७,१४,७७२
सेवेत दाखल झालेल्या संपूर्ण मार्गावर १० मे ते १९ मे दरम्यानची प्रवासी संख्या
४,७०,५३३ 

२ लाख जणांचा दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर प्रवास
बीकेसी ते आचार्य अत्रे स्थानक या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर १० मे ते १८ मेदरम्यान या नऊ दिवसांत २,०४,०४२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळत आहे. तसेच सिद्धिविनायक मंदिराला मेट्रोने प्रवास करून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Web Title: Four and a half lakh people travelled on the underground metro in ten days, passenger numbers started increasing after the second phase started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.