Join us  

"पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्व वाढून घ्यायची सवय आहे"

By मुकेश चव्हाण | Published: February 18, 2021 4:07 PM

माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. संजय राठोड यांच्या ओडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल झाले आहेत. पण संजय राठोड आमच्या संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक यांनी देखील संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. एकीकडे संजय राठोड प्रकरणात शिवसेना मंत्री चिडीचूप असताना राष्ट्रवादीचे नेते संजय राठोड यांची पाठराखण करताना दिसून येत आहे.

संजय राठोड हे माझ्या संपर्कात आहेत. यवतमाळमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये संदर्भात माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासोबत अकोला आणि अमरावतीच्याही संबंधित पालकमंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे, असं अजित पवार यांनी सांगितले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी पोलीस याबाबत संपूर्ण चौकशी करत आहेत. त्यांना त्यांचं काम करु द्यात. सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईलच, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

अजित पवारांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार का, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यायचा जरी ठरवला तरी, ते अजित पवारांना विचारणार आहेत का, असं म्हणत पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्व वाढून घ्यायची सवय आहे, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे. 

राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. प्रशासन योग्य रितिनं काम करत आहेत. चौकशी अहवाल आल्यावर कारवाई अपेक्षित जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत आरोप करणे योग्य नाही, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच संजय राठोड यांना माझा सल्ला आहे, त्यांनी खुलासा करु नये. खुलासा करण्यात नवीन प्रश्न निर्माण होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशंही नवाब मलिक यांनी सांगितले. 

संजय राठोड मौन सोडणार?

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. ती अतिशय डॅशिंग होती. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :अजित पवारनिलेश राणे भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेशिवसेना