Join us  

"...तर एक दिवस हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही"

By मुकेश चव्हाण | Published: January 16, 2021 10:37 AM

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधान अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केलं होत.

मुंबई:  एकीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळते आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे.  याचपार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती. 

निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधानही अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केलं होत. अजित पवारांच्या या विधानानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

निलेश राणे म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितलं. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे. 

कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांना मिळाले अभय-

धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतलीय, असे काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,' असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

टॅग्स :अजित पवारनिलेश राणे भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार