Join us  

"...तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारुन त्यांचं स्वागत केलं पाहिजे"

By मुकेश चव्हाण | Published: March 02, 2021 10:13 AM

वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसत आहे.

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसत आहे. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही, असा सवाल भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. 

वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ( Deputy Chief Minister Ajit Pawar) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधलं. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील. त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. 

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.  निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, १२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगड मारून केलं पाहिजे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध, असा सवालही निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

अजित पवारांनी १२ आमदारांचा विषय उपस्थित करताचा देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातलं आता ओठांवर आलं. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवलं आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस पवारांवर बरसले. आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :अजित पवारनिलेश राणे भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार