४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून साकारले देवीचे रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 03:39 IST2019-10-04T03:39:21+5:302019-10-04T03:39:49+5:30
गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड चेकनाका येथील नवयुग को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे ४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून देवीची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून साकारले देवीचे रूप
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड चेकनाका येथील नवयुग को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे ४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून देवीची प्रतिमा साकारण्यात आली आहे. कलाकार अमित गायकवाड या तरुणाने देवीचे रूप साकारण्यासाठी श्रीलक्ष्मी
कवडीचा वापर केला असून प्रतिकृती विविध अशा नवरंगाने रंगविली आहे. नवयुग सोसायटीच्या नवरात्रौत्सवाचे यंदाचे ४९ वे वर्ष असून मंडळाच्या सहकार्याने अमितने सुरेख संकल्पना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे.
कलाकार अमित गायकवाड या वेळी म्हणतो की, एकीकडे कुठेतरी लोप पावत चाललेल्या कवड्या, त्याला असणारे आध्यात्मिक महत्त्व, देवीच्या श्रृंगारात होणारा कवड्यांच्या वापर, कवड्यांची संस्कृती यांचे लोकांना स्मरण व्हावे; शिवाय आजकाल जे समुद्रातील प्रदूषण वाढतेय ज्यामुळे अनेक समुद्री संपत्तीचा ºहास होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कवड्यांपासून देवीचे रूप साकारायचे ठरवले आणि ही संकल्पना सत्यातही उतरवली. हे देवीचे रूप साकारण्यासाठी चिराग पांचाळ, धीरज चाचड, रोहित मेस्त्री, गणेश कदम, रोहित सावंत, शुभम रहाटे, अशरफ खान, कुणाल गुरव, प्रथमेश भोवड, नेहा कानेकर, पूजा पंडित, रिया यादव, कुमुद मिश्रा, महेश तांबे यांची मदत लाभली. अजित कलबाते आणि अविनाश पवार यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.