उद्यानातील वनमजुरांनी केली बिबट्यांची शिकार; ठाणे, वसईतील सहा आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:35 IST2026-04-09T13:34:57+5:302026-04-09T13:35:45+5:30
कातडे जप्त

उद्यानातील वनमजुरांनी केली बिबट्यांची शिकार; ठाणे, वसईतील सहा आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि येऊरमध्ये झालेल्या बिबट्यांच्या शिकारी प्रकरणी वन विभागाने दोन आरोपींना ताब्यात घेत बिबट्याचे कातडे जप्त केले होते. शिवाय वन गुन्हा नोंदवून तपास केला असता शिकारीतील कातडे हे येऊर व वनक्षेत्र आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याचे असल्याचे आरोपींनी कबूल केले. पुढील तपासात फरार असलेले व ज्यांचा प्रत्यक्ष शिकारीत सहभाग असलेले चार आरोपी अशा सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विशाल वरठा, मयूर म्हात्रे, अनिल धावडे, हर्षद जाधव, दिनेश पागेरा आणि संतोष घोशे अशी त्यांची नावे असून, ते ठाणे आणि वसई येथे राहणारे आहेत.
बिबट्याची हाडे, तारेचे फास व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तपासात एकूण तीन बिबट्याचे शव मिळाल्याचे व त्यांचे दात व इतर अवयव काढून घेतल्याचे समोर आले. घटना स्थळाच्या पाहणीवेळी चेना व काशी क्षेत्रात दोन बिबट्यांची शिकार झाल्याचे निश्चित झाले. घोडबंदर क्षेत्रात एका ठिकाणी एक हाड व काही केस मिळाले आहेत.
अतिक्रमण करून वास्तव्य
प्रकरणातील शिकार केलेले आरोपी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात माशाचा पाडा येथे अतिक्रमण करून राहत आहेत. आरोपींनी चार ते पाच वर्षापूर्वी वनवणवा हंगामात वनमजूर म्हणून काम केले आहे. आता वन कोठडीची मुदत संपल्यानंतर सर्व आरोपींना वसई न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीनंतर मयूर म्हात्रे यांना जामीन मंजूर केला.
रानडुकरांचे फासे वापरले
मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वनसंरक्षक अनिता पाटील, उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे हे तपास करत आहेत. तर, बिबट्यांचे अवयव विकून पैसे मिळविण्याचा हव्यास यास कारणीभूत असण्याची शक्यता आहे. बिबट्यांची शिकार रानडुकरांच्या शिकारीसाठी लावलेले फासे किंवा पारंपरिक पद्धतीने केल्याची शक्यता आहे.