सुरेश ठमकेमुंबई : दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातील सेनापती बापट मार्गावरील दत्ताजी नलावडे उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे उभारण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रत्नदीप गायकवाड यांनी मंगळवारी दिली.
उड्डाणपुलाखाली कापडी मंडप तयार करून ही मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तात्पुरते शौचालय आणि रांगेसाठी पुलाखालीच दुसरा मंडपही उभारण्यात आला आहे. या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि चार कर्मचारी कार्यरत आहेत, तसेच पोलिसही तैनात आहेत. या केंद्रामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही, तर मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांनाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे डॉ.गायकवाड यांनी सांगितले.
मतदारांची संख्या
- पुलाखालील या मतदान केंद्रावर १,३३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ६८० पुरुष, तर ६५९ महिलांचा समावेश आहे. या परिसरातील इराणी चाळ, राजू कामठी चाळ, तपोवन बिल्डिंग आणि हनुमान सोसायटीमधील मतदारांसाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
- सेनापती बापट मार्गावरील दत्ताजी नलावडे उड्डाण पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, तर शेजारी फिनिक्स मॉल आणि अन्य औद्योगिक गाळे, तसेच कार्यालय असल्याने पुलाखालील रस्त्यावरूनही मोठी वर्दळ असते.