अन्नधान्य पोहचले दोन कोटी गरजूंपयर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 18:15 IST2020-04-19T18:14:37+5:302020-04-19T18:15:07+5:30
देशभरात विस्तारलेल्या अक्षय पात्र फाऊंडेशनच्या किचन नेटवर्कचा वापर करून गेल्या महिन्याभरातील लाँकडाऊनच्या काळात तब्बल २ कोटी गरजूंना अन्न वाटप करण्यात आले आहे.

अन्नधान्य पोहचले दोन कोटी गरजूंपयर्त
मुंबई - देशभरात विस्तारलेल्या अक्षय पात्र फाऊंडेशनच्या किचन नेटवर्कचा वापर करून गेल्या महिन्याभरातील लाँकडाऊनच्या काळात तब्बल २ कोटी गरजूंना अन्न वाटप करण्यात आले आहे. या संस्थेची मुंबई, ठाणे आणि पुण्यातही किचन व्यवस्था असून तिथे सुमारे ३ लाख १३ हजार गोरगरीब आणि मजूरांना अन्न - धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्यावतीने देण्यात आली.
अक्षय पात्र फाऊंडेशन ही ना-नफा तत्वावरील संस्था आहे. ही संस्था भारतातील भूक व कुपोषणासारख्या समस्यांविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करते. अक्षय पात्र सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना अत्यंत प्रभावी पद्धतीने राबवत आहे. लॉकडाऊनमुळे प्रभावित लोकांना साह्य करण्यासाठी सरकारच्या बचावकार्यांमध्ये मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. स्थलांतरित लोक, रोजंदारी कामगार, औद्योगिक कामगार, बेघर लोक अशा वंचितांसाठी त्यांनी भोजन व्यवस्था केली आहे. फाऊंडेशनने आजवर ९३ लाख ५७ हजार लोकांना शिजवलेले अन्न व ३.०२ लाख फूड रिलीफ किट्सचे वाटप केले आहे. त्यात महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांचा समावेश आहे. मुंबईत एक लाख, ठाणे शहरांत ७३ हजार आणि पुण्यात १ लाख ४० हजार गरजूंपर्यंत ही मदत पोहचली आहे. अक्षय पात्र त्यांच्या किचन नेटवर्कचा उपयोग करत भोजन तयार करते आणि ते सरकारी अधिका-यांनी सांगितलेल्या केंद्रांकडे पुरविले जाते. श्रीमती सुधा मूर्ती व नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाने अक्षय पात्रच्या या कार्यासाठी त्यांच्या वैयक्तिक निधींमधून १० कोटी रूपयांचे योगदान दिले. अन्य काँर्पोरेट कंपन्यांसह ऋतिक रोशन व रविना टंडन यांसारख्या बॉलिवुड व्यक्तींनी देखील फाऊंडेशनच्या प्रयत्नांना मोलाची मदत केली आहे.