Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन! "रेल्वेतून आणलेला हा अधिकारी करतोय काय?" शंभूराज देसाईंनी काढला ट्रॅक रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:36 IST

सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

Neelam Gorhe takes action against the Satara SP: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व गोंधळ आणि मंत्र्यांना झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद अखेर सोमवारी विधान परिषदेत उमटले. या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस दलासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पोलीस अधिक्षकांवर निलंबनाची कारवाई करु नये अशी मागणी केली. त्यामुळे साताऱ्यातील प्रकरणामुळे शिंदेसेने भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

सभागृहात सत्ताधारी आमदारांचा संताप

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच जिल्ह्यातील निवडणुकीत पोलिसांकडून धक्काबुक्की झाली.यावरून सत्ताधारी आमदार आज सभागृहात प्रचंड आक्रमक झाले होते. सभागृहातील गोंधळ आणि शंभूराज देसाई यांनी मांडलेली कैफियत ऐकल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी उदय सामंत आणि गणेश नाईक या मंत्र्यांना विचारले की, यावर सरकारला काही निवेदन करायचे आहे का?. सरकारकडून स्पष्ट भूमिका न आल्याने गोऱ्हे यांनी थेट पोलीस अधिक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.

"ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की केली आणि मतदारांना मतदानापासून रोखले, अशा साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचे सरकारने तात्काळ निलंबन करावे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी करावी," असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले.

पक्षाने नियमाने अधिकार दिले आहेत म्हणून मी तिथे गेलो- शंभूराज देसाई

"आम्ही मंत्री वगैरे नंतर आहोत आधी मानव आहोत. आमच्या सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी सभापतींची आहे. मी पक्षाचा उपनेता आहे आणि जिल्हा परिषद सदस्याला व्हीप बजावण्याचा अधिकार आहे. पक्षाचा प्रतोद या नात्याने तो अधिकार मला दिला आहे. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला व्हीप बजवायचा होता ते करू दिलं नाही. मला पक्षाने नियमाने अधिकार दिले आहेत म्हणून मी तिथे गेलो. तुम्हाला सदस्याला ताब्यात घ्यायचं होतं तर खाली गेटवर घेऊ शकला असता किंवा मतदान करून घेऊ शकला असता. मंत्र्याला मारहाण झाल्याचा प्रकार या आधी सभागृहात कधी झाला आहे का? एवढं होऊन सुद्धा तुम्ही आम्हाला बोलायलाही देणार नाही," असं शंभूराज देसाई म्हणाले.

पोलीस अधिक्षकांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा- शंभूराज देसाई

"दहा पोलीस आम्हाला ओढत होते. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला पकडत नाही तसं आम्हाला पकडलं होतं. सभागृहाने त्या पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन चौकशीमध्ये या पोलीस अधीक्षकाच्या पाठीमागच्या सगळ्या कारकिर्दीची चौकशी करा. अंतरवाली सराटीची घटना झाली त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी मला दोन वेळेस तिथे जायला सांगितलं. एवढा प्रचंड उद्रेक होता. त्यावेळी त्या पोलीस अधीक्षकाला तिकडून का काढलं. त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड काढा. वर्षभर साताऱ्यात काय उद्योग सुरू आहेत. रेल्वे पोलिसातला कुठला कर्मचारी आणून बसवला आहे आणि काय उद्योग करण्यासाठी बसवला आहे. जर एखाद्या मंत्र्याला त्या पोलीस अधीक्षकाच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक देवकर आणि सहाय्यक निरीक्षक गरजे आणि साध्या वेषातील जे १०० पोलीस होते त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी. आमचा आक्षेप पोलिसांवर आहे. साध्या वेशातील जे १०० पोलीस होते त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी," अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Satara SP Suspended After Uproar; Desai Questions Officer's Record.

Web Summary : Satara SP suspended after chaos in council elections. Desai demands inquiry into officer's past, questioning his appointment and actions against ministers.
टॅग्स :विधान परिषदसातारा परिसरशंभूराज देसाईनीलम गो-हे