मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून बनवण्यात आलेला गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाणपूल आता जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. हा पूल तोडण्याचा महापालिकेचा विचार आहे मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. हा उड्डाणपूल २०१८ साली २७ कोटी खर्च करून उभारण्यात आला होता. या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. परंतु आता हा उड्डाणपूल मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या आड येत आहे त्यामुळे तो पाडणे आवश्यक आहे असं मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे.
मालाड पश्चिमचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी मुंबई महापालिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महापालिकेची योजना म्हणजे जनतेचा पैसा बर्बाद केल्यासारखा आहे. निवडणुकीपूर्वी सरकारला महापालिकेच्या माध्यमातून जितका फंड काढता येईल तितका काढून घ्यायचा आहे. हा पूल तोडल्याने परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी होईल. नागरिकांना त्रास आणखी वाढेल. त्यामुळे मुंबई महापालिकेने त्यांच्या निर्णयावर विचार करायला हवा. पर्यायी मार्गाची व्यवस्था शोधावी असं त्यांनी म्हटलं.
तर मुंबई महापालिकेचे हे पाऊल चुकीचे आहे. जर हा पूल तोडला तर हायवेपर्यंत पोहचण्यासाठी ४५ मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे रिअल इस्टेटसह स्थानिक व्यवसायावरही परिणाम होईल. मुंबई महापालिकेच्या त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माइंडस्पेस मालाडचे अध्यक्ष शहजाद रुस्तमजी यांनी केली आहे.
पूल तोडणे का गरजेचे?
हा पूल मुंबई कोस्टल रोड फेज २ आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या प्रस्तावित योजनेच्या आड येत आहे. जेव्हा हा उड्डाणपूल बनला होता, तेव्हा कोस्टल रोड योजना अस्तित्वात नव्हती. परंतु नव्याने वाहतूक व्यवस्था पाहता डबल डेकर उड्डाणपूल प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जो माइंडस्पेस आणि दिंडोशी यांना जोडेल असं मुंबई महापालिकेचे म्हणणं आहे.
सध्याची स्थिती काय?
सध्या हा उड्डाणपूल वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून गोरेगाव आणि मालाडला थेट जोडतो. त्यामुळे इथला प्रवास ४५ मिनिटांवरून १० मिनिटांवर आला आहे. परंतु हा पूल जमीनदोस्त झाला तर इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल. कुठल्याही नवीन उड्डाणपूलाचे आयुष्य किमान २० वर्ष मानले जाते मग अशा स्थितीत अवघ्या ६ वर्षात हा पूल का तोडला जातोय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.