Join us  

Flood : शेतकऱ्यांचं नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसतंय, अजित पवारांचा विमा कंपन्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 4:35 PM

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पुरविण्याची खबरदारी महाविकास आघाडीचे सरकार घेत असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मदत वाटपाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई - शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.  

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित सांगितले. पीक विमा हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जसे जसे पंचनामे येतील तशी लगेच मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत. सहा जिल्ह्यांची माहिती आल्यानंतर दोन जिल्ह्यांसाठी इतर जिल्ह्यांना मदत देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे सर्व विभागांना शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देश असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पुरविण्याची खबरदारी महाविकास आघाडीचे सरकार घेत असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मदत वाटपाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :अजित पवारशेतकरीपूरपाऊस