‘नो ब्रोकर’वरील भाड्याचा फ्लॅट पडला महागात; पवई पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:59 IST2025-06-07T13:59:00+5:302025-06-07T13:59:36+5:30

तक्रारदार महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे

Flat rented on 'no broker' becomes expensive; Case registered against Bhamta at Powai police station | ‘नो ब्रोकर’वरील भाड्याचा फ्लॅट पडला महागात; पवई पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा

‘नो ब्रोकर’वरील भाड्याचा फ्लॅट पडला महागात; पवई पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नो ब्रोकर ॲपवरून भाडेतत्त्वावर घर घेणे एका महिलेला महागात पडले आहे. या महिलेकडून अनोळखी व्यक्तीने वेगवेगळ्या कारणाने पैसे उकळत त्यांना दीड लाख रुपयांचा चुना लावल्याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जयश्री भाग्यवान (३१) असे या तक्रारदाराचे नाव आहे. पवई परिसरात राहण्यासाठी भाड्याचे घर हवे असल्याने त्यांनी नो ब्रोकर ॲपवर ३ जूनला नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांचे पती महेश यांना एका मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला, ज्यात पवईमधील एका फ्लॅटची माहिती होती. त्यांनी मेसेजमध्ये दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क केला. तेव्हा समोरील व्यक्तीने आशिष परिहार असे नाव सांगत अधिक संपर्कासाठी पुन्हा दुसरा नंबर दिला. तक्रारदाराने त्याच दिवशी दुपारी फोन करून फ्लॅट पाहायचा आहे, असे सांगितले. रहेजा विहार येथील सनसेट २ येथील फ्लॅट पाहण्यासाठी भामट्यांनी बोलावले.

‘पैसे मागणारी व्यक्ती फ्लॅटमालक नाही’

तक्रारदाराने फ्लॅट पसंत आल्याचे कळवल्यानंतर समोरील व्यक्तीने ४० हजार रुपये टोकन रक्कम आणि दोन लाख रुपये डिपॉझिट पाठवण्यास त्यांना सांगितले. तक्रारदाराने त्यापैकी एक लाख ४० हजार रुपये पाठवले, मात्र उर्वरित पैशासाठी आरोपींनी त्यांच्या मागे तगादा लावायला सुरुवात केली. तक्रारदाराने शेजारील फ्लॅटमधील व्यक्तीकडे चौकशी केली असता पैसे मागणारी व्यक्ती त्या फ्लॅटचा मालक नसल्याचे त्यांना समजले. तेव्हा त्यांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली.

Web Title: Flat rented on 'no broker' becomes expensive; Case registered against Bhamta at Powai police station