रसिकांच्या भेटीला येणार पाच नवीन नाटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 07:40 IST2025-04-01T07:39:53+5:302025-04-01T07:40:09+5:30

Mumbai News: मागील काही दिवसांपासून नवनवीन विषयांवरील मराठी व्यावसायिक नाटके रसिकांचे मनोरंजन करत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन नाटकांची घोषणा केली जाते. ही परंपरा कायम राखत यंदाही पाच नवीन नाटकांची घोषणा करण्यात  आली आहे.

Five new plays will be presented to the audience | रसिकांच्या भेटीला येणार पाच नवीन नाटके

रसिकांच्या भेटीला येणार पाच नवीन नाटके

 मुंबई - मागील काही दिवसांपासून नवनवीन विषयांवरील मराठी व्यावसायिक नाटके रसिकांचे मनोरंजन करत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन नाटकांची घोषणा केली जाते. ही परंपरा कायम राखत यंदाही पाच नवीन नाटकांची घोषणा करण्यात  आली आहे.

एकीकडे दिग्दर्शक महेश मांजरेकर लिखित ‘फिल्टर कॉफी’ हे नवीन नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले आहे, तर दुसरीकडे मांजरेकरांनी आपल्या आणखी एका नवीन नाटकाची घोषणा केली आहे. ‘ॲनिमल’ असे शीर्षक असलेल्या या नाटकाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा मांजरेकरांसोबत काम करणार आहे. याखेरीज तो या नाटकाची निर्मितीही करणार आहे.

रॉयल थिएटर, दी गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘करायचं प्रेम तर मनापासून’ हे रोमँटिक-कॉमेडी असलेले नाटकही रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. याचे दिग्दर्शन विजय केंकरे करणार असून, लेखन अरविंद औंधे यांनी केले आहे. 

कलाकारांची नावे गुलदस्त्यात
अष्टविनायक आणि विप्रा क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या आगामी नाटकाचे लेखन संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी केले आहे. संतोष वेरुळकर यांच्या दिग्दर्शनाखाली येणाऱ्या या नाटकातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत. निर्माते-लेखक गजानन मेस्त्री यांचे ‘मामला करोडचा’ हे वेगळ्या ढंगाचे नाटक रौनक प्रॉडक्श सादर करणार आहे. याचे सहलेखन संध्या चैतन्य यांनी केले असून, सूत्रधार शेखर दाते आहेत. कलाकार लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. 

‘सविता दामोदर  परांजपे’ पुन्हा रंगभूमीवर
दिग्दर्शक राजन ताम्हाणे ‘सविता दामोदर परांजपे’ हे ऑल टाइम क्लासिक नाटक पुन्हा रंगभूमीवर आणणार आहेत. 
शेखर ताम्हाणे लिखित या नाटकातील कलाकारांबाबत उत्सुकता आहे. त्रिकूटची प्रस्तुती आणि मॅनमेकर्स मीडियाची निर्मिती असलेले हे नाटक लवकरच येणार आहे.

Web Title: Five new plays will be presented to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.