रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:50 IST2025-05-01T05:45:37+5:302025-05-01T05:50:26+5:30
मुंबई मंडळाच्या रेल्वे समितीची बैठक बुधवारी मध्य रेल्वे मुख्यालयात झाली. महामुंबईसह नाशिक, मावळ येथील राज्यसभा, लोकसभेतील खासदारांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या समस्या, अडचणी खासदारांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या जातात. त्यांचा निपटारा करण्यासाठी रेल्वे प्रशासन बैठक आयोजित करते. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीला मुंबईतील सहांपैकी पाच खासदारांनी दांडी मारली.
मुंबई मंडळाच्या रेल्वे समितीची बैठक बुधवारी मध्य रेल्वे मुख्यालयात झाली. महामुंबईसह नाशिक, मावळ येथील राज्यसभा, लोकसभेतील खासदारांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. शिंदेसेनेचे खा. श्रीरंग बारणे (मावळ), खा. नरेश म्हस्के (ठाणे), उद्धवसेनेचे खा. राजाभाऊ वाजे (नाशिक), काँग्रेस खा. वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई), भाजपचे राज्यसभा खा. धैर्यशील पाटील, काँग्रेसचे राज्यसभा खा. चंद्रकांत हंडोरे या बैठकीला उपस्थित होते. मात्र, अन्य खासदार गैरहजर होते.
मुंबई विभागातील विकास कामे, प्रवासी सुविधा, स्थानक सुधारणा योजना, पायाभूत सुविधांची कामे, रेल्वेवरील इतर विविध मुद्द्यांवर उपस्थित खासदारांनी महाव्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सोयीसाठी केलेल्या मागण्यांची रेल्वेने दखल घेतली नाही. तसेच घेतलेल्या निर्णयांची माहिती न देता सौजन्याने उत्तरही दिले गेले नाही, याबद्दल उपस्थित खासदारांनी नाराजी व्यक्त केली.
प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी खासदारांना दिले.
‘दादर’चे चैत्यभूमी नामकरण करा
सीएसएमटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा. तसेच, दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण चैत्यभूमी करावे. आगामी संसदीय अधिवेशनातच नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात यावा. रेल्वेने ‘झिरो ॲक्सिडेंट पॉलिसी’ लागू करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना अमलात आणाव्यात. प्रत्येक स्थानकावर २४ तास आपत्कालीन रुग्णवाहिका, प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर कायमस्वरूपी रिक्षा, टॅक्सी स्टँड उभारावे, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, कर्करोग रुग्णांसाठी प्राधान्य काउंटर सुरू करावा आदी मागण्या महाव्यवस्थापकांकडे केल्याचे खा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.