मुंबई - राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयावर सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवडा हा पाच दिवसांचा असेल तर पगार तरी सात दिवसांचा का द्यायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयावरून बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ''सरकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला तर त्यांना सात दिवसांचा पगार तरी का द्यायचा. सातवा वेतन आयोग आहेच. खरंतर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा केला तरी चालेल. पण जे दोन दिवसही काम न कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा का करायचा. काही कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरून फाईल महिना महिना पुढे सरकत नाही, अशा कामच न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ का द्यायचे?'' असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा मग पगार सात दिवसांचा का? बच्चू कडूंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 20:03 IST