पाच दिवस मेट्रो; दोन दिवस टॉय ट्रेन; महिन्याला २३ कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 14:51 IST2023-08-20T14:51:29+5:302023-08-20T14:51:39+5:30
नव्याने उभारल्या जाणाऱ्या मेट्रोचे भविष्य अधांतरी असल्याचे सूतोवाच वाहतूक तज्ज्ञांनी केले आहे.

पाच दिवस मेट्रो; दोन दिवस टॉय ट्रेन; महिन्याला २३ कोटींचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: MMRDA ने मोठा गाजावाजा करत पश्चिम उपनगरात सुरू केलेल्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो आजघडीला तोट्यात असून, या मेट्रोला महिन्याला २३ कोटी रुपयांचा फटका बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ शनिवारी आणि रविवारी निव्वळ टॉय ट्रेनपुरती या मेट्रोमध्ये गर्दी होत असून, सोमवार ते शुक्रवारचा पीक अवर वगळता या मेट्रो रिकाम्या धावतात. दुसरीकडे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रोही दिवाळखोरीत असल्याने नव्याने उभारल्या जाणाऱ्या मेट्रोचे भविष्य अधांतरी असल्याचे सूतोवाच वाहतूक तज्ज्ञांनी केले आहे.
मुंबई महानगरांत सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या वाहतूक प्रकल्पांची धुरा खांद्यावर घेतलेल्या एमएमआरडीएला अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सरकारने २०२० दरम्यान मुद्रांक शुल्कात एक टक्के अधिभार आकारणी आणि पालिकांच्या तिजोरीत जमा होणारा विकास शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. १ मार्च २०१७ रोजी मेट्रो २, ३, ४ आणि ७ हे प्रकल्प व्हीयूटीपी श्रेणीतले असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आणखी काही प्रकल्पांची भर पडली.