पाच दिवसांचा उच्चांक; मुंबई@ ३८.९ अं.से., ठाणे, रायगडही तापले, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:04 IST2026-03-06T08:04:29+5:302026-03-06T08:04:41+5:30
हवामान अभ्यासकांच्या मते, अँटी-सायक्लोनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या कालावधीत मुंबईच्या कमाल तापमानात वाढच नोंदवली जाऊ शकते.

पाच दिवसांचा उच्चांक; मुंबई@ ३८.९ अं.से., ठाणे, रायगडही तापले, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजस्थान आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनमुळे उष्ण वारे कोकणाकडे वाहू लागले आहेत. या उष्ण वाऱ्यांमुळे महामुंबईतील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
दुसऱ्या दिवशीही याचा परिणाम दिसून आला. ५ मार्च रोजी मुंबईचे कमाल तापमान सुमारे ३८.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर ४ मार्च रोजीही कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. मार्च महिन्यात गुरुवारी नोंदविले गेलेले हे तापमान या मोसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे. तसेच ठाणे आणि रायगडमधील तापमानातही मोठर वाढ झाली आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, अँटी-सायक्लोनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या कालावधीत मुंबईच्या कमाल तापमानात वाढच नोंदवली जाऊ शकते. सध्या अँटी-सायक्लोनमुळे उत्तरेकडून कोकणात येणारे उष्ण वारे आणि उशिरा स्थिर होणारे समुद्री वारे या दुहेरी परिस्थितीमुळे मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हा ट्रेंड किमान रविवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. सामान्यत: समुद्री वारे सकाळी स्थिर झाल्यास कमाल तापमानात मोठी वाढ होत नाही; मात्र हे वारे दुपारनंतर स्थिर झाल्यास तापमानात लक्षणीय वाढ होते.
सोमवारनंतर दिलासा मिळण्याची शक्यता
मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३८.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. गुरुवारीही कमाल तापमान ३८.९ अंश नोंदविण्यात आले.
चालू मोसमातील हे पहिले उच्चांकी कमाल तापमान आहे. शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी कमाल तापमानाचा पारा कायम राहील.
सोमवारनंतर मुंबईकरांना दिलास मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
कुठे किती पारा?
मुंबई ३८.९
छ. संभाजीनगर ३६.६
बीड ३६.३
कोल्हापूर ३६
नाशिक ३६.५
परभणी ३८.४
सांगली ३७.५
सातारा ३६.२
सोलापूर ३८.८