First in the University of Mumbai in the QS World University Ranking | क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ राज्यात प्रथम
क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ राज्यात प्रथम

मुंबई : क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत मुंबई विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठ १४व्या, तर देशातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे सर्वोत्तम असल्याचे क्यू एस रँकिंग या जागतिक मानांकन संस्थेने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले आहे.

क्वाकरेली सायमंड (क्यू एस) यांनी देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली असून, या यादीमध्ये मुंबई विद्यापीठ आणि आयआयटी बॉम्बेची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरातील सर्वोत्तम २०० शिक्षण संस्थांची नावे क्यू एस रँकिंगने प्रकाशित केली. यात आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी, आयआयटी दिल्ली १८२व्या, तर बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स १८४व्या स्थानी आहे. २३ भारतीय संस्थांपैकी चार संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळविले आहे.

अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत भरीव कामगिरी केली आहे. म्अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत, अनेक व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १५६ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाली आहे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष व शाश्वत प्रयत्नांची ही फलप्राप्ती आहे. याचे समाधान असून, भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. प्रामुख्याने विद्यापीठ कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, केमिकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. विकासाची कास धरणारे मुंबई विद्यापीठ हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे. - डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.


Web Title: First in the University of Mumbai in the QS World University Ranking
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.