Join us

टाटा म्हणजेच ट्रस्ट... विश्वास; रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार घरी जाऊन प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 06:56 IST

उद्योगपती रतन टाटा यांना शनिवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी कुलाबा येथील टाटा यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्यासोबत होते.

‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास, अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नंतर माध्यमांना सांगितले. २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे अध्यक्ष व महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते. तत्पूर्वी टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी रतन टाटा तसेच टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन आदींशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली.

टॅग्स :टाटाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार