आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:47 IST2025-06-06T13:45:11+5:302025-06-06T13:47:03+5:30
मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या एका ७३ वर्षीय महिलेला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून तब्बल २.८९ कोटी रुपयांना ...

आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या एका ७३ वर्षीय महिलेला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून तब्बल २.८९ कोटी रुपयांना गंडा घातला. मात्र, मुंबई सायबर पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेप आणि जलद कारवाईमुळे या महिलेचे १.२९ कोटी रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.
सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने बनावट कॉल
सोमवार ते बुधवार या कालावधीत घडलेल्या या प्रकारात, महिलेला व्हॉट्सअॅप कॉलवर ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) अधिकारी असल्याचे भासवण्यात आले. नंतर एक व्यक्ती पोलीस असल्याचे सांगत महिलेला धमकावू लागला. त्याने असेही सांगितले की, तिचे नाव एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुंतले असून, तिला डिजिटल स्वरूपात अटक केली जाऊ शकते.
त्यानंतर आरोपीने महिलेचा व्हिडीओ कॉलवर एका बनावट न्यायाधीशाशी संपर्क करून दिला. त्याने सांगितले की, जर ती सहकार्य करत राहिली तर तिला तिची अटक टाळता येऊ शकते. या भीतीपोटी महिलेकडून ३ दिवसांत २.८९ कोटी रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले गेले.
सायबर हेल्पलाइनवर संपर्क केल्याने पैसे मिळाले परत
या आर्थिक नुकसानानंतर महिलेला वेगळाच संशय येऊ लागला. तिने सायबर क्राइम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधला. तत्काळ कारवाई करत, राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तातडीने कारवाई करत १.२९ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली, जी लवकरच महिलेच्या खात्यात परत केली जाणार आहे.
पोलिसांचा इशारा आणि जनजागृती
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे की, सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवू नका. कोणतीही आर्थिक माहिती देण्याआधी खातरजमा करा आणि संशयास्पद वाटल्यास लगेच सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा.