Join us

आधी शिक्षक चाखणार, नंतर विद्यार्थी खाणार; माध्यान्ह भोजनाबाबत मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:00 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनामुळे वाढलेले अन्न विषबाधेचे प्रकार लक्षात घेऊन शिक्षण विभागाने यासंदर्भात कडक मार्गदर्शक सूचना (एसओपी) लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यानुसार शाळास्तरावर आहार तयार केल्यानंतर तो विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या अर्धा तास आधी मुख्याध्यापक, शिक्षक अथवा स्वयंपाकी मदतनीस तसेच पालक उपस्थित असल्यास त्यांच्यामार्फत चव घेण्यात यावी व दर्जा तपासावा आणि तसा अभिप्राय नोंदवहीत नोंदवण्यात यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार दिल्या आहेत. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापैकी कडक मार्गदर्शन लागू केले आहे. शासनाच्या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

आरोग्यविषयक सुरक्षेची अंमलबजावणी करा

शाळांमधील अन्न पुरवठा, आहाराची स्वच्छता, अन्न साठवणूक, स्वयंपाकाच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार शाळेत अन्न विषबाधेची घटना घडल्यास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंपाकी, आरोग्य अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन यांना विशिष्ट कार्य जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. 

या आहेत मार्गदर्शक सूचना 

शाळांमध्ये वितरित अन्नाची गुणवत्ता तपासणे व नमुने २४ तास ठेवणे बंधनकारक.

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची चव आधी शिक्षक/स्वयंपाकी/पालक तपासणार.

अन्नधान्य, मसाले इ. साहित्य ‘एक वर्ष शिल्लक मुदतीचे’ असणे आवश्यक.

हात स्वच्छ धुऊनच अन्न हाताळणे, साबण, स्वच्छ पाणी उपलब्ध असणे बंधनकारक.

जेवणानंतर उलटी, जुलाब, ताप इ. लक्षणे दिसली तर तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे. 

पुरवठादारांकडून आलेल्या धान्याची गुणवत्ता चाचण्या करून नष्ट करणे किंवा दंडाची तरतूद जिल्हास्तरावर दर महिन्याला नमुन्यांची प्रयोगशाळा तपासणी

 

टॅग्स :शाळाशिक्षक