आधी बॅग स्कॅन होणार, नंतर स्टिकर लागणार, मगच रेल्वेत बसता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:30 IST2026-01-09T14:30:30+5:302026-01-09T14:30:30+5:30
एक्स्प्रेसचा प्रवास आता होणार अधिक सुरक्षित

आधी बॅग स्कॅन होणार, नंतर स्टिकर लागणार, मगच रेल्वेत बसता येणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बॅगेज तपासणी सक्तीची केली आहे. याठिकाणी सुरक्षारक्षकांकडून बॅगेज स्कॅनरद्वारे तपासणी केल्याशिवाय टर्मिनसमध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच विमानतळाप्रमाणे बॅगची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या बॅगवर स्टिकर लावण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
सीएसएमटी हे मध्य रेल्वेचे मुंबईतील प्रमुख टर्मिनस असून, येथून दररोज शेकडो मेल व एक्स्प्रेस सुटतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना अपुऱ्या असून, प्रवाशांच्या सामानाची तपासणी होत नसल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मेल-एक्स्प्रेसच्या मुख्य प्रवेशद्वारांवर दोन बॅगेज स्कॅनर बसवले आहेत.
यासोबतच लोकलच्या प्लॅटफॉर्मवरून आणि तिकीट काउंटरकडून एक्स्प्रेसच्या प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स लावून ते सुरक्षित करण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे बॅगची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे.
आता प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करणे आवश्यक
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, प्रवाशांना वैध तिकीट देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांच्या सामानाची तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रवाशांच्या बॅगमधून कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही संशयास्पद वस्तू नेली जात नाही, हे तपासणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
तसेच क्लॉक रूममध्ये ठेवण्यात येणाऱ्या सामानाचीही तपासणी केली जात असून, या उपाययोजनांमुळे रेल्वे परिसरातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.