Join us

आरआर आबांची आठवण, रोहित पाटलांनी विधानसभेत केले पहिले दमदार भाषण; CM फडणवीसांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:40 IST

Maharashtra Assembly Session December 2024: सर्वांत तरुण अध्यक्षाने सर्वांत तरुण आमदाराकडे विशेष लक्ष द्यावे. पुराणांमध्ये अमृताला वेगळे महत्त्व होते आणि आजही आहे, अशी मिश्लिक टिपण्णी करत रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विनंती केली.

Maharashtra Assembly Session December 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतु, त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अनेक सदस्य बोलले. परंतु, आरआर आबांच्या रोहित पाटील यांनी विधानसभेतील आपले पहिलेच भाषण चांगलेच गाजवले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे माजी गृहमंत्री आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे चिरंजीव रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील निवडून आले. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रोहित पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केले. रोहित पाटील यांनी टोले लगावत, शा‍ब्दिक कोट्या करत महायुतीवर निशाणा साधला.

सर्वांत तरुण आमदार असल्याने सर्वांत तरुण अध्यक्षाने माझ्याकडे विशेष लक्ष द्यावे

या देशाचं वेगळेपण टिकून आहे. त्याचे कारण असे आहे की अनेक शाह्या या देशाने पाहिल्या. पण लोकशाही या देशाच्या वाट्याला आली, ज्यामुळे संबंध जगामध्ये आपले देश वेगळेपण टिकवून ठेवू शकले. त्याचे दुसरे कारण संसदीय पद्धत आपण कमावली, त्यामुळे लोकशाहीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. त्या एकमताच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला त्यानुसार सदस्य येथे बसले आहेत. आपल्याला विनंती करेन की सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला आहे, तसा मी सर्वांत तरुण सदस्य म्हणून मान पटकावला आहे. मंत्रिमंडळाच्या या तरुण सदस्याकडे बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. माझ्याकडे लक्ष असावे याचे कारण मी सुद्धा वकिली पूर्ण करतोय. एक नंबरवरच्या बाकावर असलेल्या वकिलाला जशी तुम्ही मदत करता, तशीच मलाही कराल, असे रोहित पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आला आहे. “अमृताहून गोड तुझे नाम देवा”, आता संतांच्या वाणीतून आपले नाव गोड पद्धतीने घेतले गेले. पुढच्या काळात काम करत असातना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो, असे रोहित पाटील म्हणाले. यानंतर सभागृहातील सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला प्रतिसाद दिला. पुढे बोलताना, अमृताहूनी मुद्दाम म्हणालो. पुराणांमध्ये अमृताला वेगळे महत्त्व आहे. आजही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी विनंती करेन की विरोधी पक्षालाही सहकार्य कराल, अशी मिश्लिक टिपण्णी रोहित पाटील यांनी केली. 

 

टॅग्स :विधानसभाविधान भवनरोहित पाटिलराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीस