कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लाँच; दुसरा गर्डर बसविण्याच्या प्रक्रियेला मिळणार वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:48 IST2024-10-22T13:47:28+5:302024-10-22T13:48:13+5:30
मध्य रेल्वेने १९ आणि २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० या तीन तासांच्या विशेष वाहतूक व वीजपुरवठा दोन्हीच्या ब्लॉकदरम्यान गर्डर बसवला.

कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लाँच; दुसरा गर्डर बसविण्याच्या प्रक्रियेला मिळणार वेग
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेला पहिला गर्डर लाँच करण्यात आला. मध्य रेल्वेने १९ आणि २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० या तीन तासांच्या विशेष वाहतूक व वीजपुरवठा दोन्हीच्या ब्लॉकदरम्यान गर्डर बसवला. या पार्श्वभूमीवर पहिल्या गर्डर स्थानांतराची (साइड शिफ्टिंग) प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता दुसरा गर्डर बसवण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे पालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.
या प्रकल्पांतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकवण्याची कार्यवाही १४ ऑक्टोबरला पूर्ण झाली. मध्य रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व शनिवारी, रविवारी रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर तुळई बसवण्यात आली.
असे झाले गर्डरचे काम
७० मीटर लांब आणि ९.५० मीटर रुंद आकाराच्या या गर्डरचे वजन ५५० मेट्रिक टन आहे. गर्डर बसवण्यासाठी रेल्वे रुळालगत तुळई पूर्णतः अधांतरी (कॅण्टीलिवर) होती.
त्यानुसार आधी गर्डर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकवण्यात आला आणि आता तांत्रिक बाबी तपासून गर्डर लाॅंचिंगचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.
गर्डरवर लोखंडी सळ्या अंथरून सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल.
या दरम्यानच पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे काम हाती घेतले जाणार आहे. डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत पुलाची दुसरी तुळई बसवण्याचे आणि उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्याचे नियोजित आहे.