Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिबट्याला पहिली गोळी डोक्यावर लागली, पण तरीही तो उठला अन्...'; वाचा थरारक अनुभव

By मुकेश चव्हाण | Updated: December 19, 2020 13:51 IST

दिवसही मावळायला लागल्याने तावरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना जीपच्या टपावर बसून घुसण्याच्या सूचना दिल्या

मुंबई/ सोलापूर: जालन्यापासून करमाळ्यापर्यंत दहशतीचा थरार निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर इतिहासजम झाला आहे. टीम बारामतीच्या शार्प शूटर्सनी या बिबट्याची दहशत संपवली आणि करमाळ्यातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.

करमाळ्यातील बिटरगाव-वांगी परिसरात बिबट्याला ठार करण्यात आले. तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला शूटर थांबवून बिबट्याची कोंडी करण्यात आली. त्यामुळे बिबट्याला दुसरीकडे जाणे शक्य नव्हते. या परिस्थितीत शूटरने बिबट्याला ठार केले, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

बिबट्याविषयी खूप अफवा पसरल्या आहेत. तीन डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. ज्या परिसरात त्याला ठार केले त्याच परिसरात त्याने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्याच्याविषयीच्या माहितीचे अ‍ॅनालिसिस करण्यात आले. त्याच्या पायांच्या ठशांमुळे (पगमार्क) नरभक्षक असलेला बिबट्या हा तोच असल्याचे सिद्ध झाले. रोज सरासरी आठ किलोमीटर तो प्रवास करत होता, अशी माहिती समोर आली.

त्यानंतर हा नरभक्षक बिबट्या वांगी परिसरात दिसल्याचे समजताच हर्षवर्धन तावरे यांनी रिस्क घेत पहाटेपासून सर्व केळीच्या बाग शोधायला सुरुवात केली होती. मात्र दुपारी चारच्या सुमारास हा बिबट्या राखुंडे वस्तीजवळील एका केळीच्या बागेत दिसल्याची पक्की खबर मिळताच टीम बारामतीचे हर्षवर्धन तावरे, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि वन विभागाचे अधिकारी संजय कडू यांच्या टीमने या केळीच्या बागेला चारही बाजूने वेढले. मात्र बिबट्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती, अशी माहिती डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

दिवसही मावळायला लागल्याने तावरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना जीपच्या टपावर बसून घुसण्याच्या सूचना दिल्या आणि इतर बाजूने बाकीच्या शूटर्सनी पोझिशन घेतली. जीप हळूहळू केळीच्या बागेत घुसली. परंतु अंधार पडू लागल्याने बिबट्याचा शोध घेणे रिस्की आणि जिकिरीचे होऊ लागले होते. मात्र अचानक काही अंतरावर समोर बिबट्या दिसला. 

गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असलेला बिबट्या अतिशय हायपर झाल्याचे दिसत असतानाच त्याने या जीपकडे हल्ला करण्यासाठी धाव घेतली. आणि तोच क्षण असा होता की थोडे जरी विचलित झालो असतो तर आज बिबट्याऐवजी आपला शेवट होणार, ही जाणीव होताच या अतिशय तगड्या बिबट्यावर धवलसिंह यांनी पहिली गोळी फायर केली जी त्याच्या डोक्याला लागली. मात्र तरीही तो पुन्हा उठून हल्ल्यासाठी येत असताना दुसरी गोळी त्याच्या छातीत मारल्यावर या बिबट्याची हालचाल मंदावली. पण रिस्क टाळण्यासाठी तिसरी गोळी मारल्यावर बिबट्या ठार झाल्याचा इशारा केला. 

नरभक्षक का झाला याचा शोध घेणार-

बिबट्या सहसा माणसावर हल्ला करत नाही. मग तो नरभक्षक का झाला होता, याचा शोध हा त्याच्या जबड्याच्या अभ्यासातून करण्यात येणार आहे. जबड्यात दुखावला होता का दात तुटले होते, याचा शोध घेण्यात येणार आहे.  

टॅग्स :बिबट्यामृत्यूमहाराष्ट्रसोलापूर