Join us

आधी अश्विनी जोशी ‘बेस्ट’, दुसऱ्या दिवशी शर्मा ‘बेस्ट’; प्रशासनात बेबनाव; २४ तासांत एक कायदेशीर दुसरी अनधिकृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:52 IST

...यामुळे नगरविकास आणि सामान्य प्रशासनातील बेबनाव समोर आला. 

मुंबई : बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभाग व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नावाने २४ तासांत वेगवेगळे आदेश काढले. हा गोंधळ लक्षात येताच अश्विनी जोशी यांच्याकडे बेस्टचा पदभार सोपविण्याबाबतचे आदेश अधिकृतरीत्या निर्गमित करण्यात आलेले नाहीत, असा खुलासा नगरविकास विभागाने केला. यामुळे नगरविकास आणि सामान्य प्रशासनातील बेबनाव समोर आला. 

आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांचे अधिकार सामान्य प्रशासन विभागाकडे आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी वस्तू व सेवाकर आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश बुधवारी काढले. तर, नगरविकासच्या अखत्यारीत मुंबई महापालिका अंतर्गत बेस्ट येत असल्याने विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांच्या सहीने महापालिकेत कार्यरत अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी काढले.

बुधवारी स्वीकारला पदभार कामगार संघटना मोर्चा काढणार होते. तो हाताळण्यासाठी अश्विनी जोशींकडे महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाच्या ३१ जुलैच्या आदेशानुसार केली होती. मात्र, ५ ऑगस्टला शर्मांकडे पदभार सोपवण्याचा आदेश अधिकृत असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले. या गाेंधळादरम्यान, आशिष शर्मा यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

महत्त्वाचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाचबेस्टच्या संदर्भातील निर्णय आपण नाही तर महापालिका घेते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व महत्त्वांच्या पदावर नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे. अशा पदांच्या नियुक्ती करताना, कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घेतात, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून वाद सुरू आहे. एका पदासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. हे सगळे कशासाठी होते हे न कळण्याइतके कुणी अज्ञानी नाही. हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :बेस्टदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे