Join us

जीएसटी भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:29 IST

आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते.

ठळक मुद्देजीएसटी भवनच्या ८ व्या मजल्यावर भीषण आग या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता

मुंबई : माझगांव येथील जीएसटी भवनच्या ८ व्या मजल्यावर सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, जीएसटी भवनात जीएसटीबाबत अनेक कागदपत्रांचा साठा असल्याने या आगीत सर्वच कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी  अजित पवार म्हणाले, "मी बैठकीत असताना अधिकाऱ्यांचा फोन आला आणि मी तातडीने येथे दाखल झालो. निघण्यापूर्वी मी आयुक्तांना फोन केला आणि माहिती दिली. यानंतर मी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना फोन केला. नागरिकांची येण्या-जाण्याची व्यवस्था करा असे सांगितले. कुणी जखमी झाल्याची माहिती अजूनपर्यंत आलेली नाही."

याचबरोबर, या आगीत किती नुकसान झाले आहे, त्याची माहिती घेतली जाईल. मी अधिकाऱ्यांना विचारले त्यांनी माहिती दिली की सर्व डेटा आपल्याकडे आहे. सर्व डाटा कॉम्प्युटराईज आहे. तसेच, मला माहिती देण्यात आली की, सर्व सुरक्षित आहे, असे अजित पवार म्हणाले. याशिवाय, अशा घटना घडता कामा नये. आपण मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा सूचना दिली होती की, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीत करुन घ्या. यासंदर्भात तपास करण्याची जबाबदारी सरकार घेईल. तसेच जीएसटी भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

(Video : अग्निकल्लोळ... मुंबईत जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग)

टॅग्स :अजित पवारआगमुंबई