उंच इमारतीतील आग आटोक्यात येणार; १०४ मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 07:56 IST2025-11-24T07:55:57+5:302025-11-24T07:56:41+5:30
अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म २०१५ पासून कार्यरत आहेत. आता १०४ मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली

उंच इमारतीतील आग आटोक्यात येणार; १०४ मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया सुरू
मुंबई - मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून आता तब्बल १०४ मीटर किंवा त्याहून अधिक उंची गाठू शकणाऱ्या दोन नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मची खरेदी केली जाणार आहे.
सध्या अग्निशमन दलाकडे ९० मीटर उंचीपर्यंत पोहचू शकणारे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म असून ते इमारतीच्या तीसाव्या मजल्यापर्यंत पोहचू शकतात. यामध्ये टर्न टेबल लॅडर व उच्च क्षमतेचे वॉटर पंप असणार असून ते इमारतीच्या ३४ व्या मजल्यापर्यंत पोहचू शकणार आहेत. पालिकेच्या नियमानुसार, ३० मीटरपेक्षा (सुमारे नऊ मजले) अधिक उंचीची इमारत ही ‘हाय-राइज’ म्हणजे मानली जाते.
१० वर्षांनंतर अधिक सक्षम
अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म २०१५ पासून कार्यरत आहेत. आता १०४ मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यास दोन वर्षांची हमी आणि पाच वर्षांची सर्वसमावेशक देखभाल आणि सेवा करार बंधनकारक असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या करारांतर्गत उपकरणाची संपूर्ण सेवा, दुरुस्ती आणि तांत्रिक देखभाल केली जाईल, ज्यामुळे हे उपकरण उच्च-इमारतींतील आग विझविण्यास आणि बचावकार्यांसाठी सतत कार्यरत राहील असे त्यांनी नमूद केले.
बचावकार्याचा प्रश्न
उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा अपुरी किंवा निष्क्रीय असल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत आढळले आहे. अशा परिस्थितीत आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलापुढे बचावकार्य कसे पार पडावे याचे आव्हान उभे राहते.
ऑडिट बंधनकारक
आगींचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असून अग्निशमन तपासणीप्रमाणेच इलेक्ट्रिकल ऑडिटची अंमलबजावणी अनिवार्य आहे. गॅस सिलिंडर गळतीमुळे होणाऱ्या आगी रोखण्यासाठी जागरूकता मोहिमांसुद्धा अलीकडेच राबवल्या आहेत.