मुंबई उपनगरात गोरेगाव पूर्वेकडील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार फर्निचर मार्केटमधील ५ ते ६ गाळ्यांना ही आग लागली असून संपू्र्ण लाकडी सामान जळून खाक झालं आहे. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस देखील दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
खडकपाडा हे लाकडी फर्निचरसाठी ओळखलं जाणारं मोठं मार्केट आहे. सगळी दुकानं एकमेकांना खेटून असल्याने आग वाढण्याची भीती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ पाण्याचे बंब दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आग वाढू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.