Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 05:00 IST

घराच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात छेदीराम गुप्ता रॉकेलचा काळाबाजार करत होते. याच रॉकेलच्या साठ्याने गुप्ता कुटुंबीयांचा घात केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील एका घराला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली असली, तरी या घराच्या तळमजल्यावरील दुकानात ठेवलेल्या रॉकेलच्या साठ्याचा भडका उडाल्याने मोठा अनर्थ घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या आगीत प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (३०), मंजू गुप्ता (३०), परीस गुप्ता (७), नरेंद्र गुप्ता (१०), विधी गुप्ता (१५) आणि गीतादेवी गुप्ता (६५) अशी मृतांची नावे आहेत. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार वर्षांच्या प्रीतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने दुर्घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली.

रॉकेलचा काळाबाजार जीवावर बेतला?

घराच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात छेदीराम गुप्ता रॉकेलचा काळाबाजार करत होते. याच रॉकेलच्या साठ्याने गुप्ता कुटुंबीयांचा घात केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. नवरात्रीनिमित्त घरात लावलेला दिवा कलंडल्याने रॉकेलच्या साठ्याने पेट घेतल्याचाही संशय आहे.

गुप्ता यांचा किरणा मालाचा व्यवसाय आहे. आगीच्या घटनेनंतरही त्यांच्या घरात रॉकेलचे कॅन, तसेच रॉकेल देण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा साठा आढळला. त्यामुळे तेथे आगडोंब उसळल्याने गुप्ता कुटुंबीयांना जीव वाचवण्यासाठी बाहेर पडणे शक्य झाले नाही.

रॉकेलच्या साठ्यामुळेच आगीचा भडका उडाल्याचे प्राथमिक पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. घरात जवळपास ५० ते ६० लीटर रॉकेलचा साठा होता, असा संशय आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत 

चेंबूर आग दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :चेंबूरआग