मुंबईमेट्रो-३ च्या बीकेसी स्थानकात आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी १ वाजून ९ मिनिटांनी मेट्रो स्थानकाच्या बेसमेंटमध्ये सुमारे ४० ते ५० फूट खाली जिथं फर्निचर ठेवण्यात आले होते त्याठिकाणी ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मेट्रो-३ च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मेट्रोतील सर्व प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.
मुंबई मेट्रो-३ ही शहरातील पहिलीवहिली भुयारी मेट्रो असून आरे ती बीकेसी असा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. या मेट्रोची सर्व स्थानकं भूमिगत आहेत. त्यामुळे भूमिगत स्थानकात अशापद्धतीनं आगीच्या घटना घडत असतील तर गांभीर बाब मानली जात आहे. घटनास्थळावर आता अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणाची पाहणी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ मेट्रो सेवा रद्द करण्यात आली आहे.