दहिसरमध्ये २४ मजली एसआरए इमारतीला आग; महिलेचा मृत्यू, १८ जणांवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 00:05 IST2025-09-08T00:05:32+5:302025-09-08T00:05:40+5:30
दहिसर शांतीनगर येथील एसआरए इमारतीला लागली भीषण आग लागली.

दहिसरमध्ये २४ मजली एसआरए इमारतीला आग; महिलेचा मृत्यू, १८ जणांवर उपचार सुरु
दहिसर शांतीनगर येथील एसआरए इमारतीला रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू तर १८ जण जखमी झाले आहेत.
एसआरएची ही २४ मजली इमारत आहे. ही आग वेगाने संपूर्ण परिसरात पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीतील ३६ जणांना वाचविण्यात आले. सायंकाळी सव्वा सहा वाजता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे बीएमसीच्या अग्निशनम दलाने सांगितले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका अपंग मुलीची परिस्थिती नाजूक असून अन्य पाच जणांवर उपचार सुरु आहेत. तर अन्य एका हॉस्पिटलमध्ये १० जणांवर उपचार सुरु असून एका ४ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्य दोन हॉस्पिटलमध्ये देखील दोन जखमी उपचार घेत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.