Join us

BPCL Mumbai Fire: ...म्हणून माहुल परिसर धोक्याचा; आगीच्या भडक्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 16:30 IST

BPCL Mumbai Fire: आग लागलेला परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील

मुंबई: चेंबूरमधील बीपीसीएल कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या अठरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत बीपीसीएल कंपनीतील चार कर्मचारी जखमी झाले असून कंपनीतील इतर सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीपीसीएल कंपनी आणि या कंपनीचा परिसर अतिशय संवेदनशील समजला जातो. या भागात अनेक पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीज आहेत. बीपीसीएलसह एचपीसीएलची रिफायनरीदेखील याच भागात आहे. टाटा कंपनीचा औष्णिक प्रकल्पदेखील याच परिसरात आहे. बीपीसीएल कंपनीपासून काही अंतरावरच अणुशक्ती केंद्र आहे. या भागातील कंपन्यांमधील पेट्रोलजन्य पदार्थांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागातील अनेक कंपन्यांमध्ये पेट्रोलियम पदार्थांची साठवणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे बीपीसीएलमध्ये लागण्यात आलेली आग विझवण्यासाठी फोमचा वापर केला जात आहे. बीपीसीएल कंपनीजवळच माहुलगाव आहे. कंपनीत स्फोट झाल्यानंतर माहुलगावात स्फोटाचे आवाज ऐकू आले होते. कंपनीजवळ झोपडपट्टीचा भाग असल्यानं येथील लोकवस्ती अतिशय दाटीवाटीची आहे. याच भागात जुना कोळीवाडादेखील आहे. मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी म्हाडानं याच भागात घरं बांधली आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्या अतिशय जास्त आहे. त्यामुळेच हा संपूर्ण परिसर अतिशय संवेदनशील आहे.  

टॅग्स :बीपीसीएल आगचेंबूरआग