चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:38 IST2025-06-06T06:37:38+5:302025-06-06T06:38:08+5:30

लाखो रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Fire at Churchgate station Accident at peak rush hour Smoke all over the local platforms | चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट

चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवरील एका दुकानाला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली. आग लागताच स्टॉलवरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राचा वापर केला आणि ५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. नंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्याही दाखल झाल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीने गोंधळ उडाला होता.

आग लागलेले दुकान ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून चालवण्यात येते. सध्या तिथे मॉन्जिनीस केकशॉप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुकानातील विद्युत उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 
आगीमुळे स्टेशन परिसरात धुराचे लोट पसरले आणि प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण  निर्माण झाले. प्रवाशांनी भीतामुळे स्थानकाबाहेर धावधाव केली.

शॉर्ट सर्किटचा अंदाज, पण सखोल चौकशी

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. 

नेहमीची गाडी पकडताना प्रवाशांची धावपळ

स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना बाहेर अडवण्यात आले. त्यामुळे नेहमीची गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागली. दरम्यान, आगीच्या दुर्घटनेमुळे रेल्वे सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. 

घरी जाण्यासाठी चर्चगेटवरून नेहमीच ट्रेन पकडते. परंतु, गुरुवारी आग लागल्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर अन्य मार्गाने जावे लागले. अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वेने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
-विद्या पाटील, प्रवासी

Web Title: Fire at Churchgate station Accident at peak rush hour Smoke all over the local platforms