A fine of Rs 1000 for spit on open Place | थुंकणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड, संसर्ग टाळण्यासाठी पालिकेचे पाऊल

थुंकणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड, संसर्ग टाळण्यासाठी पालिकेचे पाऊल

मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. यापूर्वी हा दंड दोनशे रुपये होता. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता काही कठोर पावले उचलली आहेत. यामुळे दंडाची रक्कम आता पाचपट वाढविण्यात येणार आहे. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे सात रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत, तर संशयित रुग्णांची रीघ पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात वाढत आहे. सर्दी, खोकला असणाºया लोकांना तोंडाला रुमाल बांधणे अथवा मास्क लावण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही काही लोकं रस्त्यावर थुंकत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकण्यापासून परावृत्त करण्याकरिता दंडाची रक्कम वाढविण्यात येणार आहे, तसेच यामुळे क्षयरोगावरही नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.

बेस्ट बसगाड्या, रेल्वेमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. परदेशातून प्रवास करून आलेल्या लोकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात अथवा त्यांच्या घरीच वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, रस्त्यावर थुंकणे म्हणजे या आजाराला आमंत्रण असल्याने, हा धोका टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने दंड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करणा-या लोकांना शिस्त लावण्यासाठी क्लीनअप मार्शल आणि उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

जगातील सर्वाधिक क्षयरुग्ण भारतात आहेत ते फक्त आपल्या रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीमुळे. फक्त क्षयच नाही, तर कोरोनासारखे आजारही थुंकी, थुंकताना, खोकताना, शिंकताना उडालेल्या हलक्याशा तुषारांमधूनही पसरतात व साथीच्या आजारांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे कोणत्याही उपायाने का होईना, आपण आपली सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय घालवलीच पाहिजे.
-डॉ. अविनाश भोंडवे
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखा

काय करायला हवे
थुंकताना कोणीही दिसले, की पाहणारे त्याला प्रतिबंध करू शकतात.
थुंकणारा एकच असतो, पाहणारे अनेक; त्यामुळे प्रतिबंध करणे शक्य आहे.
रस्त्यावर थुंकणा-यांना जागेवर आर्थिक किंवा शिक्षेच्या स्वरूपात दंड करणारी यंत्रणा निर्माण करणे.
कारवाईच्या मागे कायद्याचे पाठबळ निर्माण करणे.
सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करणे.

पान, गुटखा, मावा या गोष्टींचे सेवन केले, की काही वेळाने थुंकावेच लागते.
गाडी असेल तर गाडीवरूनच मान वाकडी करून थुंकले जाते.
पायी जात असेल तरीही रस्त्याच्या कडेला थुंकले जाते.
पानटपºयांच्या इथे तर दिवसभरात हजारो पिंका टाकल्या जातात.
काहीही खाण्याची सवय नसली तरीही काही जणांना थुंकल्याशिवाय चैन पडत नाही. असे लोक कुठेही थुंकतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.

काय होते थुंकल्यामुळे
आजारी व्यक्तीच्या थुंकीतील आजार पसरवणारे जंतू मोकळे होतात. संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वासावाटे ते त्याच्या शरीरात जातात. ही प्रक्रिया एका नाही तर अनेक व्यक्तींच्या बाबतीत होते. प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर, आधीच आजारी असलेल्यांवर याचा परिणाम लगेच होतो.

जिथे थुंकले त्या परिसरातील धातू किंवा कोणत्याही वस्तूवर जंतू बसतात. त्याला कोणाचा हात लागला, की ते लगेच कार्यान्वित होतात. थंड वातावरण, सावली, पाणी अशा गोष्टी जंतूंना जिवंत ठेवतात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A fine of Rs 1000 for spit on open Place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.