"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:31 IST2025-09-17T13:23:41+5:302025-09-17T13:31:44+5:30
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या व्यक्तीला शोधून काढण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.

"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
Meenatai Thackeray Statue Defaced : स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याने शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला होता. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घटनास्थळावर भेट देत माहिती घेतली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात असलेल्या पुतळ्यावर अज्ञाताने रंग टाकल्याचे समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे नेते दाखल झाले. त्यानंतर पुतळ्याची स्वच्छता करून घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. दुसरीकडे राज ठाकरे यांनीही २४ तासाच्या आत आरोपींना शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचे कळल्यानंतर राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल झाले होते. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना माहिती दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच सीसीटीव्ही तपासून तात्काळ रिपोर्ट द्या असंही राज ठाकरे म्हणाले. २४ तासांच्या आत कळलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
सकाळी ६.१० वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित
"आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसही दाखल झाले. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी ६.१० वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ही घटना सकाळी ६.१० वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगितले आहे," असं स्थानिक आमदार महेश सावंत म्हणाले.