महापालिकेची आर्थिक सत्ता महिलेच्या हाती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 01:20 AM2019-11-17T01:20:44+5:302019-11-17T06:30:09+5:30

स्थायी समितीसाठी नगरसेविकांमध्येही चुरस; भाजपला थोपवण्यासाठी व्यूहरचना

Financial power of municipal corporation in the hands of women? | महापालिकेची आर्थिक सत्ता महिलेच्या हाती?

महापालिकेची आर्थिक सत्ता महिलेच्या हाती?

googlenewsNext

मुंबई : प्रतिष्ठेचे महापौरपद पदरात पाडून घेण्यासाठी एकीकडे ज्येष्ठ नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचवेळी पालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या महत्त्वाच्या स्थायी समितीसाठी पुरुष नगरसेवकांबरोबरच महिला नगरसेवकांचेही लॉबिंग सुरू आहे. भाजप विरोधी पक्षाच्या बाकावर बसल्यास त्यांना थोपविण्यासाठी शिवसेनेला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. महत्त्वाच्या पदासाठी या वेळेस ज्येष्ठ, अनुभवी महिला नगरसेवकांचाही विचार होणार आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांचा महापौरपदाचा कार्यकाळ २१ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. २२ नोव्हेंबरला मुंबईच्या महापौर पदाची सूत्रे नवीन नगरसेवकाच्या हाती येणार आहेत. हे पद या वर्षी खुल्या वर्गासाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची यादी मोठी आहे. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. स्थायी समिती सक्षम नगरसेवकाकडे सोपविणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापौर पदासाठी शिवसेना नगरसेवक उमेदवार अर्ज भरणार आहेत.

दादर परिसरात मनसेला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांना मैदानात उतरविले. राऊत यांच्याकडे सध्या सभागृह नेतेपद आहे. महापौरपदाचा कार्यकाळ त्यांनी गाजवला होता. प्रशासनावरील त्यांची पकड पाहता स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर वडाळामध्ये भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या उमेदवारीस विरोध करूनही पक्षाविरोधात बंडखोरी न करणाऱ्या श्रद्धा जाधवही या स्पर्धेत आहेत. त्याचबरोबर आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, अनंत नर या नगरसेवकांची नावेदेखील चर्चेत आहेत.

काँग्रेसच्या नगरसेवकपदी नितीन सलागरे
मुंबई : भाजपच्या नगरसेविका केसरबेन पटेल यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे पद रद्द करण्यात आले होते. त्यांच्या जागी दुसºया क्रमांकाचे काँग्रेसचे नितीन सलागरे यांना नगरसेवकपद देण्याचे आदेश लघुवाद न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सलागरे यांच्या नावाची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका महासभेत केली. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ आता २९ वर पोहोचले आहे.
पालिका महासभेत त्यांच्या नावाची घोषणा होताच, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीचे कप्तान मलिक आदी नगरसेवकांनी सलागरे यांचे सभागृहात स्वागत केले, तर सलागरे यांच्या वतीने पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. नितीन सलागरे यांनी डोक्यावर भगवा फेटा व गळ्यात काँग्रेसची मफलर परिधान करून सभागृहात प्रवेश केला व पालिकेच्या कामकाजात सहभाग घेतला.

Web Title: Financial power of municipal corporation in the hands of women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.