भाडेकरू करारात बनावट इ-चलनद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक, मनसेची चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 22:23 IST2020-12-30T22:22:15+5:302020-12-30T22:23:04+5:30
सदर प्रकार पोपळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी माहिती घेण्यास सुरवात केली . कनकीया भागातील वासुदेव कॉम्प्लेक्स मध्ये लोहकरे यांचे भाडेकरारा साठी शासन मान्य इ नोंदणी केंद्र आहे

भाडेकरू करारात बनावट इ-चलनद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक, मनसेची चौकशीची मागणी
मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात भाडे करार करताना शासनाचे मुद्रांक व नोंदणी शुल्क बुडवण्यासाठी एजंट कडून बनावट इ चलन तयार करून भाडेकरू व मालकास दिले जात असल्याचा आरोप करत या प्रकरणी चौकशीची मागणी मनसेने केली आहे . मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत , मनसेचे पदाधिकारी संदीप राणे , मीरारोड उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांनी सदर प्रकरणी पत्रकारांना माहिती दिली . पोपळे यांच्या परिचितांस आयकर विवरण पत्र दाखल करताना भाडे करारा संबंधित माहिती द्यावयाची होती .तेव्हा सदर व्यक्तीने नोंदणी चलनाची ऑनलाइन पडताळणी केली असता वेबसाईटवर त्या क्रमांकाचे चलन कोठेही आढळून आले नाही. तर एजंटने दिलेल्या चलनावर बारकोड देखील नव्हता.
सदर प्रकार पोपळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी माहिती घेण्यास सुरवात केली . कनकीया भागातील वासुदेव कॉम्प्लेक्स मध्ये लोहकरे यांचे भाडेकरारा साठी शासन मान्य इ नोंदणी केंद्र आहे . त्यांनी गेल्या २ वर्षां पासून भाडेकरार करताना शासनास मुद्रांक व नोंदणी शुल्क न भरता करार करण्यासाठी पैसे देणाऱ्यांना मात्र बनावट चलन बनवून दिली आहेत . रिंकू गुप्ता , साजिद शेख आदी अन्य एजंट देखील अश्याच प्रकारे हे रॅकेट चालवत आहेत असा आरोप पोपळे यांनी केला आहे.
अश्या प्रकारे शासनाचा मुद्रांक व नोंदणी शुल्क बुडवून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल लाटला आहे . शासन व भाडेकरार करणारे यांची फसवणूक केली आहे . त्या मुळे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करावी व सखोल चौकशी करावी अशी तक्रार मुख्यमंत्री , महसूलमंत्री , मुद्रांक जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदींना दिली असल्याचे पोपळे म्हणाले .