अखेर ‘त्या’ सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:29 IST2025-03-06T09:28:20+5:302025-03-06T09:29:03+5:30

मध्यान्ह भोजन घोटाळ्याप्रकरणी कारवाई, धान्य खराब झाल्याबाबत कुठलीही नोंद सापडली नसल्याने अपहार झाल्याचे स्पष्ट 

finally a case has been filed against that retired principal | अखेर ‘त्या’ सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेवर गुन्हा 

अखेर ‘त्या’ सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेवर गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्यान्न भोजन योजनेंतर्गत शासनाने पुरवलेली मसूर डाळ आणि हरभरा विद्यार्थ्यांना वाटप न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अखेर मंगळवारी चेंबूर मधील स्वामी विवेकानंद शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 
 
शेख यांच्या तक्रारीनुसार, चेंबूरमधील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद हायस्कूल या शाळेत राधा नारायण या १ मे २०२१ ते ऑगस्ट २०२४ या काळात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या सध्या सेवानिवृत्त आहेत. मुलुंड मधील रहिवासी भारत ठक्कर यांनी मध्यान्ह भोजनाच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली. लोकमतने ही गेल्यावर्षी या घोटाळ्याला वाचा फोडली होती.  शिक्षण उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांच्या अध्यक्षेतेखाली चार सदस्य समिती नेमण्यात आली. 

समितीने चौकशी करून २६ डिसेंबर २०२३ रोजी शेख यांच्या कार्यालयाला अहवाल सादर केला. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत धान्य पुरवणाऱ्या मुंबई महापालिकेतील शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२१ मध्ये शासनाकडून ६,४०० किलो हरभरा आणि तेवढीच मसूर डाळ शाळेला पुरविण्यात आली होती. या धान्यांपैकी राधा नारायण यांनी प्रत्यक्षात ३४८१ किलो हरभरा आणि तेवढ्याच मसूर डाळीचे विद्यार्थ्यांना वाटप केले. उर्वरित २,९९२ किलो हरभरा आणि २,९९२ किलो मसूर डाळ विद्यार्थ्यांना मिळालीच नाही. 

हरभरा, मसूर डाळ कुठेय? 

उर्वरित कडधान्य बाबत राधा नारायण यांच्याकडे चौकशी केली असता हे धान्य शाळेत पाणी साचल्याने खराब झाले आणि ते फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत महापालिका, तसेच शिक्षण विभागाला कळवले नाही. तसेच विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे व्हिडीओ किंवा फोटोही सादर केले नाहीत. चौकशीत पाणी साचल्याबाबत ही तसेच धान्य खराब झाल्याबाबत कुठलीही नोंद सापडली. त्यामुळे त्यांनीच उर्वरित धान्याचा अपहार केल्याचे स्पष्ट होताच शिक्षण विभागाने पोलिसांत तक्रार केली.

 

Web Title: finally a case has been filed against that retired principal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.