Join us

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामाला अखेर मुहूर्त; आठवड्यातील चार दिवस पूल वाहतुकीसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:27 IST

१४ फेब्रुवारीपासून अडीच महिने चालणार काम

मुंबई : पूर्व उपनगरातून मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायन उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापेक्षा जास्त रखडले होते. दुरुस्तीअभावी या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अखेर या उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामाला मुहूर्त मिळाला असून पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम १४ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येईल, असे गुरुवारी एमएसआरडीसीने जाहीर केले. दुरुस्ती काम अडीच महिन्यांत म्हणजेच एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होईल, असे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील फक्त चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. हे चार दिवस पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. या कामासाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाने मंजूर केले आहेत. हे काम ११० जॅकच्या साहाय्याने करण्यात येईल.यासाठी ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ब्लॉकच्या काळात उड्डाणपुलाच्या खालून वाहतूक होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्पष्ट केले. उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेता हे काम लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे आता एमएसआरडीसीने सांगितले आहे.

वाहतूक पोलिसांना मदतीसाठी महामंडळाने ३० ट्रॅफिक वॉर्डनही दिले आहेत. बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावर उड्डाणपुलाचे एक्सपान्शन जॉइंट बदलण्यात येतील. यासह डांबरीकरणाच्या कामाचाही समावेश आहे.

ब्लॉकचे वेळापत्रक

१४ फेब्रुवारी रात्री १०.०० ते १७ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत.२० फेब्रुवारी रात्री १०.०० ते २४ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत.२७ फेब्रुवारी रात्री १०.०० ते २ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.५ मार्च रात्री १०.०० ते ९ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.१२ मार्च रात्री १०.०० ते १६ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.१९ मार्च रात्री १०.०० ते २३ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.२६ मार्च रात्री १०.०० ते ३० मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत.२ एप्रिल रात्री १०.०० ते ६ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत.

टॅग्स :रस्ते वाहतूकमुंबईमहाराष्ट्रवाहतूक कोंडीवाहतूक पोलीस