महिलेची छेड काढणा-यांविरुद्ध अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:12 IST2018-01-17T02:12:06+5:302018-01-17T02:12:25+5:30

भररस्त्यात महिलेची छेड काढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणा-यांविरुद्ध अखेर मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Filed a complaint of rape and molestation | महिलेची छेड काढणा-यांविरुद्ध अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिलेची छेड काढणा-यांविरुद्ध अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : भररस्त्यात महिलेची छेड काढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणा-यांविरुद्ध अखेर मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एका तरुणाच्या पत्नीकडे महिलेने तिच्या पतीच्या या कृत्याबाबत तक्रार केली होती. तेव्हा ‘तू माझ्या पतीसमोर येत जाऊ नकोस,’ असा अजब सल्ला तिने पीडितेला दिला. पोलिसांनीही तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. अखेर तिने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.
वीणा (नावात बदल) ही महिला मालवणी परिसरात राहते. समीम मनिहार, नंदलाल वर्मा, फिरोज खान आणि मुस्ताक जिलानी नामक इसम हे मालवणीतील रहिवासी असून ते वीणाला सतत छेडायचे. तसेच तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करायचे. त्यांनी तिच्याकडे घरी जाऊन अनेकदा शरीरसुखाची मागणी केल्याचेही तिचे म्हणणे आहे. त्याला कंटाळून वीणा समीमच्या पत्नीला जाऊन भेटली आणि तिच्या पतीच्या वागण्याबाबत तिच्याकडे तक्रार केली. तेव्हा समीमच्या पत्नीचे उत्तर ऐकून वीणाला धक्काच बसला. कारण समीमच्या पत्नीने स्वत:च्या पतीला जाब विचारण्याचे सोडून विणालाच तूच त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि माझ्या पतीसमोर येऊही नकोस, असा सल्ला दिला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून वीणाला हे चौघे सतत त्रास देत होते.
त्यानंतर वीणा मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. मात्र, तिची तक्रार दाखल करून घेतली नाही, असेही तिचे म्हणणे आहे. त्यानंतर ती सतत पोलीस ठाण्यात फेºया मारत होती. तरीही तिची तक्रार दाखल करून घेतली नाही, असाही तिचा आरोप आहे. अखेर तिने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाने वीणाची तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश मालवणी पोलिसांना दिले. कोर्टाच्या आदेशानुसार मालवणी पोलिसांनी चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Web Title: Filed a complaint of rape and molestation