'माझी ओळख लपवली, मालमत्ता हडपली'; हाजी मस्तानच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; PM मोदींकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:54 IST2025-12-11T19:41:54+5:302025-12-11T19:54:59+5:30
मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधान मोदी, अमित शाहांना भावनिक साद

'माझी ओळख लपवली, मालमत्ता हडपली'; हाजी मस्तानच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; PM मोदींकडे मागितली मदत
Haseen Mastan Mirza: मुंबईच्या अंडरवर्ल्डचा पहिला डॉन आणि चित्रपट निर्माते हाजी मस्तान मिर्झा यांची कन्या हसीन मस्तान मिर्झा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचा प्रलंबित खटला आणि न्याय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदतीची आर्त विनंती केली आहे.
११ डिसेंबर २०२५ रोजी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये हसीन मस्तान मिर्झा पांढरी साडी नेसून, स्वयंपाकघरात उभ्या आहेत. व्हिडीओमध्ये त्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. "मी अनेक वर्षांपासून माझ्या खटल्याबद्दल बोलत आहे. पण, कोणतीही माध्यमे गंभीरपणे यावर लक्ष देत नाही किंवा मला पाठिंबा देत नाही. त्यामुळे मी इच्छा व्यक्त करते की ही गोष्ट पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचावी, आम्ही महिला इतकी वर्षे आपल्या हक्कांसाठी लढत आहोत," असे त्या म्हणाल्या.
हाजी मस्तान मिर्झा १९७० च्या दशकात मुंबईतील एक मोठे नाव होते. ते गँगस्टर पासून चित्रपट निर्माते बनले. हसीन त्यांची मुलगी असून, त्या आपल्या दिवंगत वडिलांच्या वारसा आणि कुटुंबाच्या मालमत्तेसाठी लढत आहेत. हसीन मिर्झा यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की, त्या जिवंत असेपर्यंत आपल्या हक्कांसाठी लढत राहतील. "अब्बा, तुम्ही सर्वांना न्याय मिळवून दिला. आता जग तुमच्या मुलीला मदत करेल," असे त्यांनी म्हटले.
त्यांनी आरोप केला की, त्यांची ओळख लपवण्यात आली, त्यांची मालमत्ता बळकावण्यात आली आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याचा तसेच त्यांचा खून करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. हसीन मिर्झा यांनी त्यांच्या न्यायासाठी मदतीची मागणी करण्यासोबतच, देशाचा कायदा अधिक कडक करण्याची मागणीही केली आहे.
"मी हे सांगायचे आहे की आपल्या देशाच्या कायद्याचा खूप गैरवापर होत आहे. ज्यांच्यावर आम्ही खटला दाखल केला आहे. जर आपल्या देशाचा कायदा कडक असेल, तर बलात्कार होणार नाहीत, हत्या होणार नाहीत आणि कोणीही कोणाची मालमत्ता हडपणार नाही," असे त्या म्हणाल्या. जर देशाचा कायदा मजबूत राहिला, तर लोक गुन्हा करण्यापूर्वी १० वेळा विचार करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हाजी मस्तान मिर्झा यांचे नाव पुन्हा चर्चेत आणणाऱ्या या व्हिडिओला सोशल मीडियावर अनेक युजर्सनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी मोदी आणि शाह यांना टॅग करून या संघर्षावर लक्ष देण्याची विनंती केली आहे.